पुण्यात दीड हजार डास उत्पत्तीची ठिकाणे
![Increase in mud dengue patients, neglect of administration](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/Mosquito.jpg)
एक हजार पाचशे आस्थापनांना आरोग्य विभागाच्या नोटिसा
पुणे | डेंग्यू, मलेरिया यासारख्या रोगांना आळा बसावा व त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, यासाठी डासांची उत्पत्ती ठिकाणे शोधण्याच्या दृष्टीने घरांची आणि इतर आस्थापनच्या जवळपासच्या परिसराची तपासणी महापालिकेतर्फे करण्यात येते. या तपासणीमध्ये आत्तापर्यंत सुमारे 1 हजार पाचशे डास उत्पत्तीची ठिकाणे आढळून अली आहेत. त्या सर्वाना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
शहर परिसरात वाढत्या शहरीकरणामुळे हवा, पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे साथीच्या रोगांनी शहरात थैमान घेतले असून गेल्या पाच वर्षांत शहरात डासांमुळे पसरणार्या रोगांचे प्रमाण चिकुनगुनिया आणि डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. सोसायट्यांबरोबरच घरातही फुलदाणी, फ्रिजच्या मागील ट्रे, कुंड्या यातून व तसेच रुग्णालये,निर्माणाधीन बांधकामे, सरकारी कार्यालये अशा वेगवेगळ्या ठिकाणी डेंगीचे डास आढळले आहेत. या सर्वांना नोटीस बजावण्यात येत आहेत. शहरात आतापर्यंत दीड हजार नोटीस बजावण्यात आल्या असून नोटिसांची दखल न घेणाऱ्या आस्थापनांकडून 1 लाख 14 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.
त्या दरम्यान सोसायट्या, बंगले, झोपडपट्ट्या, शाळा, विविध कार्यालये, नव्याने सुरु असलेली बांधकामे इत्यादी ठिकाणची पाहणी करण्यात येत आहे. आत्तापर्यंतच्या पाहणीत सर्वाधिक डास उत्पत्ती ठिकाणे ही नव्याने सुरु असलेल्या बांधकाम साईट्सवर सापडली आहेत. वारंवार नोटिसा देऊन देखील डास उत्पती ठिकाणे नष्ट न करणाऱ्या आस्थापना विरोधात गेल्या वर्षी महापालिकेने कोर्टात खटला दाखल केला होता. कोर्टाने त्यांना दंड आकारला आहे.