कोणाच्या सल्ल्यानंतर साखर सोडताय, शरीरावर होणाऱ्या ‘या’ परिणामांबाबत सजग आहात ना?
![Following someone's advice to give up sugar, are you aware of the 'these' effects on the body?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/533671-sugar-habit.jpg)
बऱ्याचदा वजन कमी करायचंय म्हणून असंख्य प्रयत्न केले जातात. यामध्ये एक सल्ला सातत्यानं मिळताना दिसतो, तो म्हणजे साखर आणि मीठ कमी करा किंवा ते खाणंच बंद करा. तुम्हाला वाचून धक्का बसेल, पण प्राण्यांमध्ये केलेल्या निरीक्षणानुसार साखर ही कोकोनहून अधिक प्रभावी काम करते. अद्यापही माणसांवर यासंदर्भातलं निरीक्षण करण्यात आलेलं नाही. पण, हा अहवालही भुवया उंचावत आहे. साखर खाल्ल्यानंतर फक्त शरीरातच नाही तर, मानसिकतेतही बदल होतात. मेंदूमध्ये साखरेच्या सेवनामुळे तयार होतात.
साखर न खाण्यामुळे शरीरावर सकारात्मक परिणाम होतात हे खरं. किंबहुना ते नाकारताच येत नाहीत. कारण काहीशी कठीण वाटणारी ही सवय अंगी बाणवल्यास तुम्ही जास्त वेगानं विचार करु लागला, मधुमेह तुमच्यापासून बऱ्यापैकी दूर राहतो, वजन वेगानं कमी होतं, शरीर हलकं वाटू लागतं, त्वचा चमकदार होते आणि असे बरेच बदल जाणवू लागतात.
काहींच्या बाबतीत अचानकच शरीराला होणाऱ्या साखरेच्या पुरवठ्यात खंड पडल्यास डोकेदुखी, अशक्तपणा, चक्कर येणं, मेंदूवर अधिक ताण येणं किंवा झोप येणं अशी लक्षणंही दिसू लागतात. हे का होतं, याचा विचार केलाय का? तर, साखर मग ती कोणत्याही माध्यमातून असो. जेव्हा शरीराला होणारा तिचा पुरवठा बंद होतो तेव्हा मेंदूच्या काम करण्याच्या पद्धतीत बदल होतात. याचा इशारा हळुहळू संपूर्ण शरीलाला मिळतो आणि पुढच्या सर्व क्रिया घडतात.
सुवर्णमध्य साधा…
थोडक्यात शरीराला सवयीच्या एखाद्या घटकाचा पुरवठा एकाएकी बंद करण्यापेक्षा संतुलित आहार, व्यायामाच्या सवयी , प्राणायाम आणि निरोगी जीवनशैलीच्या दृष्टीनं महत्त्वाची पावलं उचलल्यास ही वेळ येणारच नाही. निर्णय तुमचा आहे!