नगरमधील ‘सन फार्मा’ कारखान्याला आग; वरिष्ठ अधिकाऱ्याचा होरपळून मृत्यू
![नगरमधील ‘सन फार्मा’ कारखान्याला आग; वरिष्ठ अधिकाऱ्याचा होरपळून मृत्यू](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/sunfarma.jpg)
नगर |
नगर येथील एमआयडीसीमधील ‘सन फार्मा’ या औषध निर्मिती करणाऱ्या कारखान्यास गुरुवारी भीषण आग लागली. या आगीमध्ये उत्पादन विभागातील रावसाहेब माघाडे या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा होरपळून मृत्यू झाला. आगीमध्ये कारखान्याचेही मोठे नुकसान झाले. कारखान्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला असला तरी परिसरातील नागरिकांकडून वायू गळतीचा दावा केला जातो आहे. तपासणीसाठी कंपनीच्या तज्ज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र ते रात्री सायंकाळपर्यंत दाखल झाले नव्हते. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रावसाहेब कडू माघाडे (५२, सध्या रा. नगर, मुळ रा. मांजरी, गंगापूर, औरंगाबाद) असे होरपळून मृत्युमुखी पडलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. माघाडे हे कारखान्यात वरिष्ठ अधिकारी (उत्पादन) म्हणून काम करत होते. सन २०१० पासून ते कारखान्यात नोकरीला होते.
कंपनीतील अधिकाऱी व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या येथील कारखान्यात ‘इथेल प्रोफाइल अल्कोहोल’च्या १० ते १२ टाक्या आहेत. हे रसायन ज्वालाग्राही आहे. त्यातील सात क्रमांकाच्या टाकीला बुधवारी रात्री १० च्या सुमारास आग लागली. या टाकीत १० केएल रसायन होते. महापालिकेचे २, एमायडिसीचे २ व राहुरी नगरपालिकेचा एक बंब घटनास्थळी आग विझवण्यासाठी धावला. मध्यरात्रीनंतर आग आटोक्यात आली. घटनास्थळी माघाडे यांचा होरपळलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. तिथे साळुंके नावाचा आणखीन एक कर्मचारी काम करत होता तो मात्र बचावला. कंपनीतील अधिकाऱ्याच्या माहितीनुसार टाकीच्या ठिकाणी मनुष्यबळ उपस्थित असण्याची आवश्यकता नसते, मात्र आग लागल्यानंतर ती विझवण्यासाठी माघाडे धावले असावेत. औद्योगिक सुरक्षा संचालनालयाचे सहायक संचालक स्वप्नील देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी सुरू केली. मात्र या तपासणीत काय आढळले याची माहिती मिळू शकली नाही.
- सात वर्षांतील तिसरी दुर्घटना…
सन २०१६ मध्ये सन फार्मा कंपनीच्या नगरमधील कारखान्यात बांधकाम सुरू होते, यंत्राच्या साह्याने पाया खोदला जात असताना ठिणग्या उडून स्फोट झाला होता. त्यामध्ये चौघा बांधकाम कामगारांचा मृत्यू झाला. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यापूर्वी, दोन वर्षांपूर्वी कारखान्यात वायुगळती होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती परिसरातील नागरिक देतात. काल रात्री आगीच्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.