‘डेल्टा’मुळे अमेरिकेच्या करोनाचा नाश करण्याच्या प्रयत्नांना मोठा धोका- डॉ. फौची यांचा इशारा
नवी दिल्ली |
‘डेल्टा’ या करोनाच्या अत्यंत संसर्गजन्य प्रकारामुळे करोनाचा समूळ नाश करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना मोठा धोका निर्माण झाल्याचा इशारा व्हाइट हाउसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अॅन्थनी फौची यांनी दिला आहे. डेल्टा हा प्रकार सर्वप्रथम भारतात आढळला असून आता अमेरिकेतील २० टक्क्यांहून अधिक जणांना त्याची लागण झाली आहे, दोन आठवड्यांपूर्वी हे प्रमाण केवळ १० टक्के इतकेच होते, असेही डॉ. फौची यांनी मंगळवारी करोना स्थितीबाबत माहिती देताना स्पष्ट केले.
ब्रिटनमध्येही सध्या हीच परिस्थिती असून डेल्टा प्रकारामुळे अमेरिकेच्या करोनाचा समूळ नाश करण्याच्या प्रयत्नांना मोठा धोका निर्माण झाला आहे. तथापि, अमेरिकेतील लशी डेल्टा प्रकाराविरुद्ध परिणामकारक आहेत ही आनंदाची बाब आहे, असेही डॉ. फौची यांनी वार्ताहरांशी दूरदृश्य प्रणालीमार्फत संवाद साधताना स्पष्ट केले. आपल्याकडे डेल्टाचा मुकाबला करण्याचे प्रभावी हत्यार आहे, त्यामुळे त्याचा वापर करा आणि डेल्टाचा प्रादुर्भाव चिरडून टाका हे तात्पर्य आहे, असेही ते म्हणाले. ब्रिटनमध्ये डेल्टा प्रकाराने सध्या अल्फा या करोनाच्या प्रकारालाही मागे टाकले आहे.