#Covid-19: देशात लसीची कमतरता नाही- डॉ. हर्षवर्धन
![# Covid-19: There is no shortage of vaccines in the country- Dr. Harshavardhana](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/Harshwardhan.jpg)
पुणे |
देशातील कोणत्याही भागात करोना लसीचा तुटवडा नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे. केंद्र सरकार सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना गरजेनुसार पुरवठा करत असल्याचंही ते म्हणाले आहेत. मंगळवारी हर्षवर्धन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ११ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेदेखील उपस्थित होते. हर्षवर्धन यांनी यावेळी देशात परिस्थिती नियंत्रणात असून अनेक त्रुटी दाखवून दिल्या. यावेळी त्यांनी बेजबाबदार वर्तन आणि निष्काळजीपण करोनाचा कहर वाढण्याचं कारण असल्याचं अधोरेखित केलं. हर्षवर्धन यांनी यावेळी करोना रुग्णसंख्या वाढत असली तरी देशाचा रिकव्हरी रेट ९२.३८ असून मृत्यूदर १.३० टक्के असल्याची माहिती दिली.“गेल्या दोन महिन्यात देशातील करोना रुग्णसंख्या अचानक वाढली आहे. अॅक्टिव्ह रुग्संख्या कमी असून रिकव्हरी रेट ९२.३८ आहे. करोना रुग्णसंख्या वाढत असली तरी देशातील मृत्यूदर १.३० टक्के आहे,” अशी माहिती हर्षवर्धन यांनी यावेळी दिली.
Health Minister @drharshvardhan reviews the #COVID19 situation and vaccination progress in 11 States/UTs showing large numbers of cases; urges to take up mass awareness campaigns to re-instill the importance of COVID appropriate behaviour
Read: https://t.co/ZpZ4rurTmF
(1/2) pic.twitter.com/7gYjalSQJb
— PIB India (@PIB_India) April 7, 2021
“आपल्यासाठी हा चिंतेचा विषय आहे, एक वर्षाच्या अनुभवानंतर आपल्याकडे खूप ज्ञान आहे पण अद्यापही अनेक त्रुटी आहेत. पण मला वाटतं सध्यातरी परिस्थिती नियंत्रणात आहे. याआधी असलेलं धोरण आपण नीट राबवलं तर संख्या कमी होईल,” असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला. सर्व गोष्टी पुन्हा सुरु झाल्या असून लोकांचं निष्काळजी वागणं मोठी चिंतेची बाब असल्याचं यावेळी ते म्हणाले.
महाराष्ट्राला मागणीप्रमाणे लशींचा पुरवठा करा!
“महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणामध्ये राज्याने आघाडी घेतली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने मागणीप्रमाणे लशींचा पुरवठा करावा. २५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करावे, महाराष्ट्रात ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता अन्य राज्यांकडून त्याचा पुरवठा करण्याबाबत केंद्र शासनाने निर्देश द्यावेत,” अशी मागणी यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली. बैठकीत विविध मुद्दे मांडताना महाराष्ट्रात करोना नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. लसीकरणाला गती मिळावी यासाठी केंद्र शासनाने मागणीप्रमाणे पुरवठा करण्यावर टोपे यांनी भर दिला. या वेळी राज्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते.
या वेळी आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, राज्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज ४ लाखांहून अधिक जणांना लसीकरण केले जात आहे. वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रणासाठी लसीकरण जास्त उपायकारक असून राज्याने त्याला गती दिली आहे. राज्यातील लसी वाया जाण्याचे प्रमाणही खूपच कमी आहे. राज्यात सध्याचा लशींचा साठा लक्षात केंद्र शासनाकडून तातडीने मागणी प्रमाणे पुरवठा होणे गरजेचे आहे. कोव्हॅक्सिनची मागणी वाढल्याने त्याचाही अतिरिक्त पुरवठा करावा, असे टोपे यांनी सांगितले. राज्यात २५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे मागणी केली आहे. आढावा बैठकीत टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडेही या मागणीचा पुनरुच्चार केला. राज्यात सध्या रुग्णसंख्या आढळतेय त्यात २५ ते ४० वयोगटातील संख्या अधिक आहे आणि या वयोगटातील नागरिकांना व्यवसायानिमित्त बाहेर पडावे लागते. ही बाब लक्षात घेऊन २५ वर्षांवरील नागरिकांचा समावेश लसीकरणाच्या प्राधान्य यादीत करण्याची मागणी टोपे यांनी केली.
वाचा- बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांचे आवाहन