#Covid-19: ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी भारतीय हवाई दलाची मदत घेण्याचा विचार
![# Covid-19: The idea of enlisting the help of the Indian Air Force to transport oxygen](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/oxygen-8.jpg)
मुंबई |
देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणा हतबल झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे राज्यांनी केंद्र सरकारकडे मदतीचा हात मागितला आहे. ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी राज्यांकडून केंद्र सरकारकडे वारंवार मागणी केली जात आहे. त्यामुळे राज्यांना वेळेत ऑक्सिजन पुरवठा व्हावा यासाठी केंद्र सरकार आता हवाई दलाची मदत घेण्याचा विचार करत आहे. परदेशातून ऑक्सिजनचे कंटेनर वेगाने राज्यांमध्ये पोहचवण्याचा सरकारचा मानस आहे. ऑक्सिजनची कमतरता जाणवत असल्याने भारताने आखाती देश आणि सिंगापूरमधून आयातीचा विचार केला आहे.
‘देशातील करोना स्थिती आणि आरोग्य यंत्रणेवर पडत असलेला ताण पाहता, हवाई दलाची मदत घेण्याचा विचार केला जात आहे. सध्या आमच्याकडे ऑक्सिजन आयात करण्यासाठी कंटेनर नाहीत. मात्र ऑक्सिजन आयात करावा लागला तर कसा करावा यावर विचार सुरु आहे. ज्या राज्यात ऑक्सिजनची जास्त गरज आहे. तिथे ऑक्सिजन कंटेनर थेट पोहोचवण्याचा विचार सुरु आहे.’, अशी माहिती संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. ‘परदेशातून ऑक्सिजन कंटेनर आणण्याबाबत अजूनही कोणताच आदेश आलेला नाही. हवाई दल यापूर्वी देशात करोना स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करत आहे. हवाई दलाकडून ऑक्सिजनसह वैद्यकीय उपकरणं पोहोचवण्यासाठी काम सुरु आहे.’, असं हवाई दलाच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. भारतीय हवाई दल करोनातील लढाईत आपलं मोलाचं योगदान देत आहे. हवाई दलाकडून वैद्यकीय उपकरणं, कर्मचारी, महत्त्वाची सामुग्री आणि औषधं देशातील कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम सुरु आहे.
वाचा- #Covid-19: Oxygen Shortage! चीनचा भारताला मदतीचा हात; पण भारताची मात्र पाठ