#Covid-19: दिव्यांग व्यक्तींना लसीकरणासाठी विशेष सुविधा उपलब्ध करा- जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे
![# Covid-19: Provide Special Vaccination Facilities for Persons with Disabilities - Senior Corporator Sima Sawale](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/Seema-savle-.jpg)
पिंपरी |
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून नागरिकांना कोरोना विरुद्ध बचाव करण्यासाठी लस देण्यात येत आहे. शासनाच्या वतीने ४५ + वयाच्या नागरिकांना लस देण्यात येत आहे. तसेच दि. १ मे २०२१ पासून वय वर्ष १८ पेक्षा अधिक वय असलेल्या सर्व नागरिकांना देखील लस देण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. लसीकरण करण्यासाठी ठराविक केंद्रांवरच व्यवस्था असल्याने अशा ठिकाणी लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. लसींची मर्यादित उपलब्धता आणि लस घेण्यासाठी होत असलेल्या गर्दीमुळे दिव्यांग व्यक्तींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लस घेण्यासाठी रांगेत तासंतास उभे रहावे लागत आहे. दिव्यांग व्यक्तींना अशा प्रकारे रांगेत उभे राहणे त्रासदायक ठरते. तरी लसीकरणाच्या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य देण्यात यावे.
तसेच ज्याठिकाणी लसीकरण केंद्र हे पहिल्या अथवा दुसऱ्या मजल्यावर असेल अशा ठिकाणी तळ मजल्यावरच दिव्यांग व्यक्तींना लस देण्याची विशेष व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी जेष्ठ नगरसेविक सिमा सावळे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे. आपल्या निवेदनात सिमा सावळे म्हणतात, शासनाच्या वतीने १८ + व्यक्तींना लस घेण्यासाठी Online नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र दिव्यांग व्यक्तींना आणि विशेषकरून अंध व्यक्तींना Online नोंदणी करणे अत्यंत अडचणीचे अथवा अशक्य ठरत आहे. तसेच अनेक दिव्यांग व्यक्तींकडे स्मार्ट फोन उपलब्ध नसल्याने लस घेण्यासाठी Online नोंदणी करणे शक्य होत नाही. यास्तव १८ + च्या दिव्यांग व्यक्तींना Online नोंदणीची सक्ती न करता त्यांना प्राधान्याने लस देण्याची व्यवस्था तातडीने करण्यात यावी. उक्त बाबींचा विचार करता दिव्यांग व्यक्तींना लस देण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश प्रशासनाने त्वरित द्यावेत, अशी आग्राही सुचना सिमा सावळे यांनी केली आहे.
वाचा- #Covid-19: ‘चीनकडून २०१५ मध्येच करोनाचा जैविक अस्त्र म्हणून विचार’