breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

#Covid-19: ठाण्यासह १८ जिल्ह्यांत गृहअलगीकरण बंद

  • बाधितांचे प्रमाण अधिक असल्याने राज्य सरकारचा निर्णय

मुंबई |

राज्यातील करोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कठोर निर्बंधामुळे ५० टक्के भागातील करोनाची साथ नियंत्रणात आली आहे. मात्र, ठाण्यासह १८ जिल्ह्य़ांतील बाधितांचे प्रमाण राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक असल्याने या सर्व जिल्ह्य़ांतील गृहअलगीकरण बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे तेथील बाधितांना करोना केंद्रात दाखल केले जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी दिली. राज्यात गेल्या दीड महिन्यापासून कठोर निर्बंध लागू असून, दैनंदिन रुग्णसंख्या घटली आहे. मुंबईसह राज्यातील निम्म्या जिल्ह्य़ांतील करोना प्रादुर्भाव नियंत्रणात आला असून, तेथे नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाटय़ाने कमी होत आहे.

मात्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये करोनाचा फैलाव कायम आहे. तेथील गृहअलगीकरण बंद करून रुग्णांना करोना केंद्रात दाखल करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. त्यासाठी १५ व्या वित्त आयोगातून उपलब्ध निधीतून ग्रामपंचायतींनी २५ टक्के निधी हा करोना काळजी के ंद्र उभारणीसाठी वापरण्याचे आदेश देण्यात आल्याची माहितीही टोपे यांनी दिली. ग्रामीण भागातील ७० हजार आशा स्वयंसेविका आरोग्य विभागाचा कणा म्हणून ओळखल्या जातात. ग्रामीण भागातील करोनाची साथ रोखतानाच आता आशा स्वयंसेविकांना प्रतिजन (रॅपीड अँण्टीजेन) चाचणी आणि स्वयंनिदान चाचणी करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

जिल्हे कोणते?

ठाणे, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, उस्मानाबाद, बीड, रायगड, पुणे, हिंगोली, अकोला, अमरावती, कोल्हापूर, सांगली, गडचिरोली, वर्धा, नाशिक, अहमदनगर, लातूर या जिल्ह्य़ांतील करोना बाधितांचे प्रमाण राज्याच्या सरासरी (१२टक्के )पेक्षा अधिक आहे. त्यामुळे तेथील गृहअलगीकरण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी रुग्णांना आता करोना केंद्रातील अलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.

राज्यात करोनाचे २४,१३६ नवे रुग्ण

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत करोनाच्या २४,१३६ नव्या रुग्णांचे निदान झाले असून, ६०१ जणांचा मृत्यू झाला. राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली आहे. सध्या ३ लाख १४ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. पुणे जिल्हयात सर्वाधिक ४५,६४८ रुग्ण हे उपचाराधीन आहेत.

म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनसाठी जागतिक निविदा

राज्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढत असून, सध्या २२४५ रुग्ण आहेत. या आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेले ‘अ‍ॅम्फोटेरेसीन बी’ इंजेक्शन मिळविण्यासाठी सरकारने जागतिक निविदा काढली आहे. त्यामाध्यमातून साधारणत: जूनच्या पहिल्या आठवडय़ात या इंजेक्शनच्या ६० हजार मात्रा राज्यात दाखल होतील, अशी माहिती टोपे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button