#Covid-19: रुग्णसंख्या घटल्याने प्राणवायूच्या मागणीत घट
![“कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणाचाही मृत्यू नाही”; उत्तर प्रदेश सरकारचा दावा](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/oxygen_tank.jpg)
विरार |
करोनाच्या दुसऱ्या लाटेतून शहराला दिलासा मिळत आहे. मागील आठवडाभरापासून शहरातील रुग्णांची संख्या झपाटय़ाने कमी होत आहे. यामुळे प्राणवायूची मागणी काहीशी कमी झाली असून शहरातील रुग्णालयात खाटांची उपलब्धता वाढली आहे. सध्या प्राणवायूची १२ मेट्रिक टनने मागणी कमी झाली आहे. त्यामुळे शहराला केवळ १८ मेट्रिक टनची गरज भासत आहे. रुग्ण कमी झाल्याने लयातील खाटांची उपलब्धता १५ ते २० टक्क्यांनी वाढली असल्याची माहिती पालिका वैद्यकीय विभागाने दिली आहे. वसई-विरार शहरात करोनाच्या दुसऱ्या लाटेने आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे काढले होते. त्यात मार्च आणि एप्रिल महिन्यात मोठय़ा प्रमाणात रुग्णांची संख्या वाढून गंभीर होण्याचे प्रमाण वाढल्याने अचानक मोठय़ा प्रमाणात प्राणवायूची मागणी वाढली होती. शहराला दररोज ३० मेट्रिक टन प्राणवायूची गरज लागत होती. परंतु केवळ २५ मेट्रिक टन प्राणवायूची उपलब्धता होत होती.
प्राणवायूच्या कमतरतेमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. प्राणवायू मिळवण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत होती. त्याचबरोबर मोठय़ा झपाटय़ाने करोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना उपचारासाठी रुग्णालयात प्राणवायू खाटा उपलब्ध होत नव्हत्या. ४३ खासगी रुग्णालये आणि पालिकेची दोन रुग्णालये असूनही अनेकांना वेळेवर खाटा उपलब्ध न झाल्याने आपल्या जीवाला मुकावे लागले होते. पण मागील आठवडय़ापासून दुसऱ्या लाटेचा कहर कमी होताना दिसत आहे. मागील आठवडाभरापासून शहरातील रुग्णसंख्या कमी होत आहे. त्याचबरोबर गंभीर रुग्णांचे प्रमाणसुद्धा कमी होत असल्याचे दिसून आले आहे. मागील आठवडाभरात केवळ १ हजार ६८८ रुग्ण आढळून आले आहेत, तर ३ हजार ७०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्या ८ हजार ४९८ रुग्ण उपचार घेत आहेत. कमी होत चाललेली रुग्णांची संख्या ही दिलासादायक बाब आहे.
वाचा- #Covid-19: चंद्रपूर जिल्ह्य़ात आरोग्य संसाधनाअभावी तेराशे रुग्णांचा मृत्यू- सुधीर मुनगंटीवार