#Covid-19: बीड जिल्ह्यात पंधरा दिवसांनंतर रुग्णसंख्येत निम्म्याने घट
![Iodine swallowing is not a cure for corona!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/coronav660.jpg)
बीड |
करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत होते. आठ दिवसांपूर्वी हजाराच्या आत आलेली रुग्णसंख्या तब्बल पंधरा दिवसानंतर निम्म्याने घटली आहे. गुरुवारच्या अहवालात नवीन ६०३ बाधितांची नोंद झाली असून रुग्ण कमी होऊ लागल्याने जिल्हा वासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरोग्य यंत्रणेवरील ताण देखील कमी होऊ लागला आहे. रुग्णसंख्येत घट झाली असली तरी मृत्यूचे प्रमाण मात्र अद्यापही कमी झाले नाही. गेल्या चोवीस तासांमध्ये तेरा मृत्यूची नोंद झाली आहे.
बीड जिल्ह्यात गुरुवारी प्रशासनाला प्राप्त ५ हजार ५८८ अहवालात ६०३ बाधित आढळले आहेत. अकरापैकी दहा तालुक्यांतील रुग्ण शंभरच्या आत असून बीड तालुक्यात मात्र तब्बल १६५ बाधितांची नोंद झाली आहे. अंबाजोगाई, आष्टी, गेवराई आणि परळी या चार मोठय़ा तालुक्यांत रुग्णसंख्येत मोठी घट झाली असली, तरी बीडमध्ये मात्र प्रतिदिन शंभरच्या पुढेच रुग्ण निष्पन्न होत आहेत. मराठवाडय़ात सर्वाधिक रुग्ण जिल्ह्यात असल्याची नोंद झालेली असून आठ दिवसांपूर्वी हजाराच्या पुढे असलेला आकडा कमी होऊ लागला आहे. १२ मे रोजी प्रशासनाला प्राप्त ४ हजार २८८ तपासणीच्या अहवालात १ हजार २७० रुग्ण आढळले होते. त्यानंतर करोना ओसरू लागला. मात्र सातशेच्या पुढेच बाधितांची नोंद होत होती. गुरुवारच्या अहवालाने मात्र नागरिकांसह प्रशासनालाही मोठा दिलासा दिला असून पंधरा दिवसांनंतर रुग्णसंख्येत निम्म्याने घट झाल्याचे समोर आले.
वाचा- शिवसेनेला धक्का! मुक्ताईनगरचा वचपा काढला माथेरानमध्ये; शिवसेनेच्या १० नगरसेवकांचा भाजपात प्रवेश