#CoronaVirus: भारतात संसर्ग विस्फोटाचा धोका- WHO
![In Pimpri Chinchwad, the positivity rate of corona patients is 19.22](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/covidHospitalBed2-1203485574-770x533-1-650x428-1.jpg)
भारतात आतापर्यंत कोविड १९ संसर्गाचा विस्फोट झाला नसला तरी तो होण्याची जोखीम कायम आहे. कारण टाळेबंदी उठवण्यात आल्यानंतर रुग्णांची संख्या वाढू शकते, असे जागतिकआरोग्य संघटनेने म्हटले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन आरोग्य कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक मायकेल रायन यांनी सांगितले की, करोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग भारतात आता तीन आठवडे आहे. याचा अर्थ ही वाढ घातांकी नसली तरी ती कमी झालेली नाही. भारताच्या वेगवेगळ्या भागात कोविड १९ साथीचा परिणाम वेगवेगळा आहे. त्यात ग्रामीण भाग व शहरी भाग यातही फरक दिसून येतो. दक्षिण आशियात भारतच नव्हे तर बांगलादेश, पाकिस्तान यासह इतर देशात लोकसंख्येची घनता जास्त आहे. अजून तरी कोविड १९ संसर्गाचा विस्फोट झालेला नाही, पण तसे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रोगाने समाजावर आपल्या पाऊलखुणा उमटवल्या आहेत. तो केव्हाही वाढण्याचा धोका नाकारता येत नाही. टाळेबंदीमुळे भारतातील संसर्ग मर्यादित राहिला हे खरे असले तरी टाळेबंदी उठवल्यानंतर तो आता वाढू शकतो. मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर , लोकसंख्येची वाढती घनता, असे अनेक प्रश्न भारतात आहेत. त्यातही स्थलांतरित लोकांना घरी बसूनही चालणार नाही. त्यांच्या चरितार्थाचा पश्न आहे. भारत सध्या कोविड संसर्गात सहाव्या क्रमांकावर गेला आहे. त्याने इटलीला मागे टाकले आहे पण मृत्युसंख्या कमी आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितले की, भारतात दोन लाख रुग्ण असले तरी देशाची लोकसंख्या १.३ अब्ज आहे त्यामुळे रुग्णांचा आकडा फार जास्त म्हणता येणार नाही. रुग्ण वाढीवर नजर ठेवणे गरजेचे असून ती वाढता कामा नये. ग्रामीण भागात काही ठिकाणी लोकसंख्या विरळ आहे. शहरात लोकसंख्या घनता जास्त आहे. टाळेबंदी उठवल्यानंतर नियमांचे पालन करावेच लागणार आहे. त्यासाठी लोकांच्या वर्तनात बदल करावा लागेल. शहरांमध्ये सामाजिक अंतर राखणे काही ठिकाणी कठीण आहे. सार्वजनिक ठिकाणी लोकांनी मुखपट्टय़ा वापरल्या पाहिजेत.