करोनामुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण आला आहे- राजेश टोपे
![आम्ही कुणाला ‘वाइन प्या’ असे म्हणूच शकत नाही, म्हणणारही नाही- आरोग्यमंत्री राजेश टोपे](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/Rajesh-Tope-1.jpg)
मुंबई |
विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेऊन पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग १ फेब्रुवारी पासून सुरु करण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याची प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्याचबरोबर राज्य आणि स्वतःच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी दुसरा डोस घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे. करोनामुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण आल्याचंही टोपे यांनी यावेळी सांगितलं.
जालन्यामध्ये आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना टोपे म्हणाले, “करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टींवर निर्बंध लावण्यात आले. हॉटेल्स, लग्न कार्यालयं अशा अनेक गोष्टींवर निर्बंध आहेत. अशा परिस्थितीत शासनाकडे जो कर जमा व्हायला हवा, तो होत नाही. लोकांचंही उत्पन्न मोठ्या प्रमाणावर बुडतं, त्यांचंही नुकसान होतं, झळ सोसावी लागते. त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर, करोना प्रादुर्भावापासून जीविताची सुरक्षा करणंही आवश्यक आहे आणि आर्थिक हानीही होता कामा नये. हे लक्षात घेऊनच महाविकास आघाडी सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. मला असं वाटतं की जरी नुकसान झालं असलं तरी ते राज्याच्या जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून सरकारने ते सहन केलं आहे. कोणतीही विकासकामं त्यामुळे थांबवलेली नाहीत. महत्त्वाच्या बाबी, आवश्यक बाबी, शेतकऱ्यांचं नुकसान, मदत काहीही थांबलेलं नाही. सगळं काही सुरळीत सुरू आहे. महाराष्ट्राची आर्थिक शक्ती तेवढी आहे. याचप्रमाणे पुढेही सर्व काही सुरू ठेवायचं आहे”.
ब्रिटन आणि फ्रान्सच्या पंतप्रधानांनी आता आपल्याला करोनाबरोबर राहायचं आहे असं म्हटलं आहे.त्यामुळे या राष्ट्रांपासून बोध घेऊन आगामी काळात टास्क फोर्स आणि केंद्र सरकारच्या सूचनांचं पालन केलं जाईल, असंही टोपे यांनी म्हटलं आहे. राज्य,समाज आणि स्वतःच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावं, असं आवाहन देखील टोपे यांनी केलं आहे. नागरिकांनी करोना लसीकरण करून घेऊन करोना नियमांचं पालन केल्यास आपण लवकरच करोनावर मात करू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.