सोनालीसाठी ‘या’ अभिनेत्रीची भावनिक पोस्ट

हाय ग्रेड कॅन्सरशी झुंज देणाऱ्या सोनाली बेंद्रेवर सध्या न्युयॉर्कमध्ये उपचार सुरु असून अनेक बॉलिवूड कलाकारांनी तिच्यासाठी प्रार्थना केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच अनेक सेलेब्सने , सोशल मीडिया यांच्याद्वारे तिला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. काही दिवसापूर्वीच अभिनेत्री मनीषा कोइराला आणि दिव्या दत्ता या दोघींनी सोनालीसाठी भावनिक पोस्ट लिहीली होती. त्यानंतर आता अभिनेत्री आणि मॉडेल लिसा रे हीने देखील सोनालीला आधार दिला आहे.
सोनाली बेंद्रेने स्वत: तिच्या कॅन्सरची माहिती ट्विटरद्वारे चाहत्यांना दिली होती. त्यानंतर ती उपचारासाठी न्युयॉर्कला रवाना झाली. मात्र उपचार सुरु असतानादेखील सोनाली प्रत्येक सेलेब्सने तिच्यासाठी केलेल्या ट्विटला उत्तर देताना दिसून येत आहे. त्यातच कॅन्सरवर मात करणाऱ्या लिसानेदेखील सोनालीसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.
‘प्रिय सोनाली, तुझ्या कॅन्सरविषयी ऐकून धक्का बसला. खरंतर मी या साऱ्यातून गेले आहे त्यामुळे कोणत्या शब्दात तुझं सांत्वन करुन हे समजत नाही. एवढंच सांगू शकते कि लवकरात लवकर बरी हो आणि परत ये’, अशा शब्दात लिसाने सोनालीसाठी भावनिक पोस्ट लिहीली आहे.
दरम्यान, लिसाचं हे पत्र वाचून कॅन्सरशी दोन हात करताना तिला कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागलं असेल याचा अंदाज लावता येतो. लिसाला ‘मल्टिपल मायलोमा’ हा रक्ताचा कॅन्सर झाला होता. मात्र या कॅन्सरशी तिने खूप हिमतीने लढा दिल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे तिच्या या लढ्याचा अनुभव तिने ‘द यलो डायरीज’ या ब्लॉगवर वेळोवेळी ‘शेअर’ केले आहेत.





