कुरापतखोर शेजाऱ्यांवर बळाचा वापर गरजेचा; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत

Mohan Bhagwat | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी शेजारील राष्ट्रांच्या कुरापतींना आळा घालण्यासाठी बळाचा वापर करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. काही देशांमध्ये हिंदू समाजावर होणाऱ्या छळापासून संरक्षणासाठी हिंदू समाजाने एकजुटीने उभे राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. बेंगलुरू येथे अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीनंतर ‘ऑर्गनायझर’ या साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत भागवत यांनी ही मते मांडली.
मोहन भागवत म्हणाले, की भारताला सैन्य आणि अर्थव्यवस्थेच्या बाबतीत इतके सामर्थ्यशाली बनवले पाहिजे की कोणत्याही शक्ती एकत्र आल्या तरी भारताला पराभूत करू शकणार नाहीत. मात्र, केवळ शक्ती पुरेशी नाही; ती नीतिमत्तेशी जोडलेली असावी. शक्तीचा उपयोग दुष्ट शक्तींचा नाश करण्यासाठी आणि चांगल्यांचे रक्षण करण्यासाठी व्हायला हवा.
मोहन भागवत यांनी हिंदू समाजाच्या ऐक्यावर विशेष भर दिला. हिंदू समाजाने भाषा, जात आणि प्रांत यासारख्या भेदभावांना विसरून एकजुटीने देशाच्या विकासासाठी कार्य केले पाहिजे. भारत हा हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू समाज हाच या देशाचा जबाबदार समाज आहे, असे ते म्हणाले. त्यांनी परदेशात हिंदूंवर होणाऱ्या छळाचा उल्लेख करताना सांगितले की, हिंदूंनी सामर्थ्यशाली बनले तरच त्यांच्या हक्कांचे रक्षण होऊ शकते.
या मुलाखतीत त्यांनी भारताच्या सीमांवरील आव्हानांवरही भाष्य केले. आपण आपल्या सीमांवर दुष्ट शक्तींचा सामना करत आहोत. अशा परिस्थितीत भारताने स्वतःच्या संरक्षणासाठी स्वावलंबी असणे गरजेचे आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. भागवत यांनी RSS च्या शतकपूर्तीच्या संदर्भात संघाची भूमिका स्पष्ट करताना म्हटले, संघाचा उद्देश केवळ हिंदू समाजाला एकत्रित करणे हाच आहे. यामुळे भारताला जागतिक स्तरावर आदर्श ठरविण्याची संधी मिळेल.