उन्हाळ्यात रोज एक चमचा गुलकंदाचे सेवन केल्याने आरोग्याच्या या समस्यापासून मिळेल आराम

Health : उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेवर मात करण्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या घरांमध्ये नैसर्गिक आणि पारंपरिक पेय व खाद्य पदार्थ बनवले जाता. त्यामध्ये असाच एक पदार्थ आहे तो म्हणजे गुलकंद, जो ताज्या गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवला जातो. तर हा गुलकंद केवळ चविष्टच नाही, तर शरीर आणि मनाला थंडावा देखील देतो. गुलकंद हा उन्हाळ्यासाठी शरीराचे तापमान थंड ठेवण्यासाठी एक उत्तम सोबती मानला जातो. गुलकंदाचा सुगंध आणि गोड चव पिढ्यानपिढ्या भारतीय घरांमध्ये जपली गेली आहे. त्यासोबतच गुलकंद हा थंडावा देणारा, नैसर्गिक पदार्थ विशेषतः उन्हाळ्यात लोकप्रिय असतो. चला तर मग रोज एक चमचा गुलकंदाचे सेवन केल्याने आपल्या आरोग्याला कोणते फायदे मिळतात ते जाणून घेऊयात.
गुलकंद हा पदार्थ केवळ चवदारपणा आणि थंडावाच देत नाही, तर भारतीय परंपरा आणि उत्कृष्ट खाद्यसंस्कृतीचे प्रतीकही आहे. खुप आधीच्या काळापासून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरी गुलकंद बनवला जायचा आणि हा गुलकंद मुलांना चमचाभर खायला देत असे. ज्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उष्मघातापासून बचाव होतो.
आरोग्य तज्ञांच्या मते गुलकंदमध्ये गुलाबाच्या पाकळ्यांचे नैसर्गिक गुणधर्म असतात, जे शरीराला थंडावा देतात. यामुळे उष्णतेमुळे येणारा थकवा, चिडचिड आणि तणाव कमी होण्यास मदत होते.
उन्हाळ्यात पोटाचे विकार अनेकदा वाढतात. या समस्येपासून त्वरीत आराम मिळवण्यासाठी दररोज थोड्या प्रमाणात गुलकंदचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि आम्लपित्तापासून आराम मिळतो.
गुलकंदमध्ये चांगल्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. तसेच उन्हाळ्यात त्वचेच्या समस्या देखील होत असतात आणि या समस्येमुळे त्वचा लवकर निस्तेज होऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्यात तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार टिकवून ठेवण्यासाठी गुलकंदाचे सेवन करा. यामुळे त्वचेला आतून पोषण मिळते. त्यासोबतच गुलकंदाच्या योग्य प्रमाणात सेवन केल्याने शरीराच्या तापमानाचा नैसर्गिक समतोल राखण्यासही मदत होते.
गुलकंद अनेक प्रकारे खाल्ले जाऊ शकते. ते थेट चमच्याने खाल्ले जाऊ शकते, दूध किंवा दह्यामध्ये मिक्स करून सरबत बनवता येते. तसेच आईस्क्रीममध्ये गुलकंद टाकून सुद्धा खाल्ले जाऊ शकते. उन्हाळ्यात अनेकांसाठी गुलकंदसोबत थंड दूध किंवा सरबत पिणे हा एक आवडता पेय पदार्थ आहे.
उन्हाळ्यात कृत्रिम आणि पॅकेज केलेल्या शीतपेयांऐवजी घरगुती गुलकंद फायदेशीर ठरतो. मात्र मधुमेहींनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच त्याचे सेवन करावे, कारण त्यात गोडवा आणणारे स्वीटनर्स असतात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)





