होम क्वारंटाईन रूग्णांसाठी ‘भरारी पथक’ नेमावे- कैलास कदम
![Appoint ‘Bharari Pathak’ for Home Quarantine Patients - Kailas Kadam](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/FB_IMG_16.jpg)
पिंपरी |
कोरोनाच्या दुस-या लाटेत पिंपरी चिंचवड शहरात दररोज दोन हजारांहून जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयात आणि खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे बहुतांशी रुग्णांना डॉक्टर होम क्वॉरंटाईनचा सल्ला देतात. परंतू होम क्वॉरंटाईनचे रुग्ण शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. अशा रुग्णांमुळे आता एकाच कुटूंबातील अनेक लोक बाधित होण्याचे प्रमाण वाढत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पिंपरी चिंचवड मनपाने ‘भरारी पथक’ नेमावे. या पथकाने अचानकपणे रुग्णांच्या घरी भेट देऊन पाहणी करावी. नियमांचे उल्लंघन करणा-या नागरीकांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक कैलास कदम यांनी महापौर माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.
सोमवारी (दि.१२ एप्रिल) कदम यांनी दिलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, मागील फेब्रुवारी महिण्यापासून राज्यामध्ये पुन्हा कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. पिंपरी चिंचवड शहरातही मागील आठवड्यापासून रोज अडीच ते तीन हजारांहून जास्त रुग्ण कोरोना पॉजिटिव्ह होत आहेत. वाढत्या रुग्णसंख्ये पुढे आपले प्रशासन हतबल झाल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे. पिंपरी चिंचवड मनपाच्या बहुतांशी रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांना बेड, ऑक्सीजन बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे हजारो रुग्ण रोज (होम क्वॉरंटाईन) गृह विलगीकरणात राहत आहेत. गृह विलगीकरणामध्ये शासनाने घालून दिलेले नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे मार्च महिण्यापासून शेकडो कुटूंबातील एकाहून जास्त व्यक्ती कोरोना बाधित होत आहेत. गृह विलगीकरणातील रुग्ण अनेकदा नियमांचे पालन करीत नाहीत. त्यामुळे इतरांना देखिल बाधा होते. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी भरारी पथक नेमावे. तसेच होम क्वॉरंटाईन असणा-या रुग्णांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक व फौजदारी कारवाई करावी.
ज्येष्ठ व्यक्ती व पौढ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्यास ऑक्सीजन बेडची गरज पडते. वाढलेल्या रुग्णांना मनपा रुग्णालयांत बेड मिळत नाहीत. पर्यायाने हजारो रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतात. हि खासगी रुग्णालये बेकायदेशीर बीलांची आकारणी करतात. यावर ना मनपा प्रशासनाचे व राज्यशासनाचे नियंत्रण नाही. यामुळे गोरगरीबांचे आर्थिक शोषण होत आहे. यासाठी आपल्या मनपा हद्दीतील रुग्णालयांच्या बीलांची तपासणी करण्यासाठी आवश्यक ते लिपीक व लेखापाल आपण नेमावेत. शहरातील सर्व मनपा रुग्णालयांत रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत देण्यात येईल असे महापौरांनी जाहिर केले होते. त्यासाठी तेहतीस लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली. परंतू प्रत्यक्षात मात्र दाखल रुग्णांना फक्त दोनच रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात येतात उरलेले रुग्णांना स्वखर्चाने आणायला लागतात. शहरात आज कोठेही इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे नातेवाईकांना नाहक त्रास होत आहे. हे इंजेक्शन खरेदीसाठी असणारा ठराव स्थायी समितीने स्थगित ठेवला आहे. हि कृती म्हणजे मानवतेला काळीमा फासणारी आहे. पीएम केअर फंडातून पिंपरी चिंचवड मनपाला पन्नास व्हेंटीलेटर देण्यात आले आहे. परंतू वैद्यकीय विभाग आणि प्रशासनाच्या औदासिन्यामुळे हे व्हेंटीलेटर धुळखात पडून असल्याचे आज एका माध्यमाने पुराव्यासह सिध्द केले आहे. या हलगर्जीपणाला जबाबदार असणा-या अधिका-यांवर कारवाई केली पाहिजे. ‘लॉकडाऊन एक’ काळात ज्या प्रमाणे प्रशासन सर्व पातळीवर यशस्वीपणे कोरोनाशी सामना करीत होते. तशी यंत्रणा उभी करुन पुन्हा कोरोनावर नियंत्रण मिळवावे लागेल.