शहरात ‘ओमायक्रॉन’चा आढळला नवीन एक रुग्ण
![A new patient with ‘Omycron’ was found in the city](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/two-cases-of-omicron-in-karnataka-first-known-infected-person-slips-out.jpg)
कोरोनाचा नवीन विषाणू असलेल्या ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग झालेले एक नवीन रुग्ण आज (मंगळवारी) पिंपरी-चिंचवड शहरात सापडला आहे. या रुग्णाला महापालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहराबाहेरील एक आणि आज आढळलेला एका अशा दोन रुग्णांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आजपर्यंत शहरातील 11 आणि बाहेरील 1 अशा 12 रुग्णांची नोंद झाली.आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा प्रादुर्भाव होत आहे. केंद्र व राज्य शासनाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सूचित केले आहे. त्यानुसार महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या अनुषंगाने महापालिकेतर्फे तपासणी मोहीम सुरू आहे. सद्यस्थितीत शहरात ओमायक्रॉनचे दोन सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी एक रुग्ण शहराबाहेरील असून शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
आतापर्यंत शहरातील 11 आणि बाहेरचा 1 असे ओमायक्रॉनचे 12 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये परदेशातून आलेल्या 5 जणांचा समावेश आहे. तर शहरातील त्यांच्या संपर्कातील 7 जणांचा समावेश आहे. यापैकी 10 रुग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
परदेशातून आलेल्या आणि त्यांच्या संपर्कातील 46 जणांची कोरोना तपासणी पॉझिटिव्हिट आली आहे. त्यापैकी 30 रुग्णांची पुन्हा दहाव्या दिवशी कोरोना तपासणी करण्यात आली आहे. त्या सर्व रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे या रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर उर्वरीत परदेशातून आलेल्या आणि त्यांच्या संपर्कातील रुग्णांची कोरोना तपासणी करण्याचे कामकाज सुरू आहे.