breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमराठवाडा

बीडमध्ये म्युकरमायकोसिसचे ७४ रुग्ण; धोका वाढला

बीड |

करोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच जिल्ह्यात आता म्युकरमायकोसिसचाही धोका वाढत आहे. या आजाराची आतापर्यंत ७४ रुग्णांना लागण झाल्याचे समोर आले. या रुग्णांवर बीडच्या शासकीयसह, अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यामध्ये म्युकरमायकोसिसचा आजार आढळून आलेले ७४ रुग्ण करोनाबाधित होते. रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर त्यांच्यामध्ये बुरशीजन्य आजाराचे प्रमाण दिसून आले. त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोळ्याबरोबरच तोंडातही बुरशीचा संसर्ग होण्याचे प्रकार वाढू लागले आहेत.

जिल्हा आरोग्य विभागाने या रुग्णांना म्युकरमायकोसिस होण्याच्या कारणांचा अभ्यास केला असता यामध्ये मधुमेह असणाऱ्या व्यक्तींमध्ये त्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. एकूण ७४ पैकी ६८ रुग्णांना मधुमेह असल्याची बाब विश्लेषणातून समोर आली आहे. करोनाच्या उपचारादरम्यान यापैकी ५६ रुग्णांवर स्टेरॉईड औषधीचा वापर केला होता. करोनाची लागण झाल्यानंतर शरीरातील प्राणवायूची पातळी कमी झाल्याने २९ रुग्णांना कृत्रिम प्राणवायू लावण्यात आला होता. त्यानंतर त्यांना म्युकरमायकोसिसचे निदान झाले. रुग्ण वाढत असले तरी आतापर्यंत जिल्ह्यात वेळीच निदान व योग्य उपचारामुळे अकरा जणांनी म्युकरमायकोसिसवर मात केली आहे. काही रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून सध्या ५५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.

म्युकरमायकोसिसचे आठ बळी

करोना विषाणू संसर्गाची बाधा झाल्यानंतर त्यावर मात करून मृत्यूला परतवणारे आठ रुग्ण करोनापश्चात म्युकरमायकोसिसचे बळी ठरले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. बुधवारी प्रशासनाला प्राप्त ५५०१ अहवालात ७०३ बाधित रुग्ण आढळले आहेत. बीड तालुक्यात सर्वाधिक २२६, आष्टी ९२, अंबाजोगाई ४२, धारुर २५, गेवराई ६६, केज ६४, माजलगाव ३०, पाटोदा ४६, शिरुर ६३, वडवणी ३३ तर परळी तालुक्यात १५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

वाचा- कोविड उपाययोजनेकरिता तब्बल ६ कोटी खर्च

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button