महिलेचा चुकीच्या उपचाराने मृत्यू; डॉक्टरांवर गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/doctor.jpg)
सावंतवाडी – माळगाव येथील निलम जितेंद्र राऊळ (३२) या महिलेचा चुकीच्या उपचाराने मृत्यू झाल्या प्रकरणी वेंगुर्ला येथील डॉ राजेश्वर उबाळे यांच्यावर भा.द वि कलम ३०४ -अ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. डॉ उबाळे यांनी वेंगुल्रे ग्रामीण रुग्णालयात निलम राऊळ यांच्यावर २६ फेब्रुवारी रोजी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केली होती. यावेळी देण्यात आलेल्या एनिमा चा डोस जास्त झाल्याने निलम राऊळ यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत राऊळ यांच्या कुटुंबियांनी वेंगुल्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
निलम राऊळ या आपल्या मामाच्या मुलाच्या लग्नाला आपल्या माहेरी वेंगुर्ला तुळस येथे आल्या होत्या. याठिकाणी असतानाच येथील प्रथमिक आरोग्य केंद्रातील एका नर्स ने या कुटुंबनियोजन शत्रक्रियेबबत दिलेल्या सल्ल्या नुसार निलम राऊळ वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी २६फेब्रुवारी रोजी आल्या शत्रक्रियेदरम्यान त्यांना एनिमा चा डोस जास्त दिल्याने राऊळ याना प्रचंड वेदना होऊ लागल्या. यावेळी त्यांनी आपली शस्त्रक्रिया थांबवा असे डॉ उबाळे याना सांगितले मात्र यावर दुर्लक्ष करून त्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर राऊळ यांची तब्येत अधिक बिघडल्याने त्यांना वेंगुल्रे गाडी अड्डा येथील संजीवनी हॉस्पिटल मध्ये दाखल करा असे डॉ उबाळे यांनी सांगताच राऊळ याना त्याठिकाणी दाखल करण्यात आले.
मात्र तब्येत अधिक बिघडत असल्याचे लक्षात येताच आता आपल्याकडून उपचार होणार नाहीत तुम्ही याना गोवा बांबुळी येथे हलवा असे डॉ उबाळे यांनी सांगितल्याने राऊळ यांच्या नातेवाईकांनी त्यांना गोवा बांबुळी येथे दाखल केले. १७ मार्च रोजी राऊळ यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. राऊळ कुटुंबीयांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केल्यानंतर २६ एप्रिल रोजी वैद्यकीय अधिकारी ओरोस यांच्या अहवालानुसार डॉ राजेश्वर उबाळे यांचा हलगर्जीपणा उघड झाला. डॉ उबाळे आपल्या पत्नीच्या मरणास कारणीभूत असल्याचे सांगत पती जितेंद्र राऊळ यांनी दिली वेंगुल्रे पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यानुसार डॉ राजेश्वर उबाळे यांच्यावर २७ एप्रिल रात्री ११.३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून वेंगुल्रे पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.