TOP Newsमुंबई

प्रेयसीच्या महागड्या फोनचं कर्ज फेडण्यासाठी त्यानं लढवली शक्कल, नंतर खावी लागली जेलची हवा

। उल्हासनगर । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

प्रेयसीला घेऊन दिलेल्या महागड्या मोबाईलचं कर्ज फेडण्यासाठी एका तरुणाने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये घडलाय. अखेर पोलिसांनी मोबाईल लोकेशनद्वारे कर्नाटकातून या तरुणाला ताब्यात घेतलं आणि हा सगळा प्रकार उघड झाला. उल्हासनगरच्या शांतीनगर परिसरातील जयश्री टिंबर ट्रेडिंग कंपनीत सोनू हरिराम भारती हे काम करतात. त्यांचा पुतण्या विजयकुमार चंद्रभान भारती हा १४ ऑगस्टला रात्री साडेदहाच्या सुमारास चिकन आणण्यासाठी गेला. मात्र रात्री उशीरापर्यंत तो घरी आला नाही. त्यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास विजयकुमार याचे वडील चंद्रभान भारती यांना अज्ञात इसमाने मोबाईलवरुन फोन करून “विजय तुम्हारा कौन है? उसकी सलामती चाहते हो, तो २ लाख रूपये दो, नही तो उसे मार दूंगा! और जल्दीसे पैसे का इंजताम करो, नही तो उसे मार दूंगा! और इस बारे में पुलिस को पता नही चलना चाहिए!” अशी धमकी देत २ लाख रुपयांची मागणी केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.

मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर कोकरे यांनी तपासाची सूत्र हाती घेत तांत्रिक तपास करून अपहृत तरुणाचं लोकेशन मिळवलं. हे लोकेशन उद्यान एक्स्प्रेसने बंगळुरूच्या दिशेनं जात असल्याचं समजताच कर्नाटक रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून त्यांना विजयचा फोटो पाठवण्यात आला. मात्र त्यांना विजय सापडला नाही. त्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे विजयकुमार याला बुधवारी कर्नाटकच्या रायचूर रेल्वे स्टेशनवर रायचूरचे पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी त्याचं अपहरण झालेलं नसून हा सगळा बनाव असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानुसार मध्यवर्ती पोलिसांनी रायचूर गाठत विजयचा ताबा घेऊन त्याला उल्हासनगरला आणलं. विजयकुमार याने त्याला गर्लफ्रेंडला कर्ज काढून महागडा मोबाईल घेऊन दिला होता. मात्र हे कर्ज फेडण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसल्यानं त्यानं स्वतःच्याच अपहरणाचा बनाव केला असल्याची कबूली दिली. त्यानुसार त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकण्यात आल्याची माहिती उल्हासनगर परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली.

अपरहरण आणि खंडणीच्या प्रकारामुळे सुरुवातीला पोलिसही धास्तावले होते. या तरुणाची सुटका करण्यासाठी पोलिसांनी मोठी यंत्रणा कामाला लावली होती. मात्र अखेर हा बनाव असल्याचं समोर आल्यानं पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button