breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

ग्राऊंड रिपोर्ट: राजकारणातील अघोरींना एकोप्याचा ‘जगतापी उतारा’

जगताप कुटुंब अभेद्य : अल्पसंतुष्टांच्या महत्त्वाकांक्षांवर पाणी 

पिंपरी । विशेष प्रतिनिधी 

चिंचवड विधानसभा मतदार संघातील जगताप कुटुंबामध्ये दुही निर्माण करुन, राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या अल्पसंतुष्ट राजकीय प्रवृत्तींना एकसंघ जगताप घराण्याने चांगलीच चपराक दिली आहे. 

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा उत्तराधिकारी कोण? अशी चर्चा शहराच्या राजकारणात हेतुपुरस्सर घडवून आणली. त्यात भाजपामधील काही अल्पसंतुष्ट आणि महाविकास आघाडीतील महत्त्वाकांक्षी लोकांनी फुंकर घातली. त्याद्वारे जगताप कुटुंबामध्ये दोन गट निर्माण झाल्याचे भासवण्यात आले. मात्र, या पोटनिवडणुकीत ‘जगताप पॅटर्न’ यशस्वीपणे राबवून विजयश्री खेचून आणत अनेकांचे मनसुभे उधळून लावले. 

दरम्यान, अश्विनी जगताप आणि शंकर जगताप यांच्यात मतभेद आहेत. त्यामुळे २०२४ ला मोठे वादळ निर्माण होणार असून, त्याचा परिणाम मतदार संघातील विकासकामांवर होणार आहे, असा ‘नॅरेटिव्ह सेट’ करण्यासाठी एक विशिष्‍ट यंत्रणा कामाला लागली होती. ‘झारीतील शुक्राचार्याचा’ हा डाव ओळखून जगताप कुटुंबाने राजकीय आणि कौटुंबिक समंजसपणा दाखवत आपला एकोपा आणखी मजबूत केला आणि त्याद्वारे चिंचवडमधील बालेकिल्ला अभेद्य ठेवला. त्यामुळे अनेकांची अस्वस्थता वाढली आहे.  

दोन दिवसांपूर्वीच, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत चिंचवड मतदार संघातील विविध नागरी समस्या व रखडलेले प्रकल्प प्रलंबित कामाबाबत आमदार अश्विनी जगताप यांनी सर्व माजी नगरसेवकांसह आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या समवेत आढावा बैठक घेतली. या बैठकीला चिंचवड विधानसभा भाजपा निवडणूक प्रभारी शंकर जगताप अग्रभागी उपस्थित होते. त्यामुळे अल्पसंतुष्ठांच्या भुवया उंचावल्या आहेत, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

अतिमहत्त्वाकांक्षी लोकांची विमाने जमिनीवर!

विद्यमान आमदार अश्विनी जगताप आणि भाजपाचे चिंचवड विधासभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप यांच्यात मतभेद असल्याचे चित्र उभा करुन अघोरी आनंद घेणाऱ्या पुरेपूर प्रयत्न पुरता फसला. जगताप कुटुंब अभेद्य असून, अघोरींना आमच्या एकोप्याचा निश्चितपणे ‘ताप’ होईल, असा सूचक इशाराच या बैठकीतून जगताप कुटुंबियांनी दिला आहे. विशेष म्हणजे, या बैठकीला अपवाद वगळता भाजपाचे सर्व माजी नगरसेवक जातीने उपस्थित होते. त्यामुळे भाजपात दुही निर्माण होवून चिंचवडमध्ये राजकीय पोळी भाजेल, अशा भ्रमात असलेले अतिमहत्त्वाकांक्षी लोकांची विमाने जमिनीवर आली आहेत, असा दावा दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा सर्वसामान्य कार्यकर्ता, समर्थकांमधून केला जात आहे. 

शंकर जगताप ‘डिसिझन मेकर’ नेतृत्व…

चिंचवड विधानसभा मतदार संघात निवडणूक प्रभारी शंकर जगताप यांच्या रुपाने भाजपाला उच्चशिक्षीत आणि प्रोफेशनल नेतृत्व मिळाले आहे. महापालिका कामकाजाचा अनुभव आणि व्यावहारिक जाण असल्यामुळे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हयातीतच त्यांच्याकडे पक्ष संघटना आणि मतदार संघातील कामाची जबाबदारी पडली होती. त्यामुळे जुने-नवे आणि नाराज अशा सर्वांची मोट बांधत चिंचवडमध्ये शंकर जगताप यांनी मैदान मारले. विशेष म्हणजे, महापालिका प्रशासनामध्ये दिवंगत जगताप यांच्याप्रमाणेच शंकर जगताप यांचा ‘शब्द’ अंतिम मानला जात आहे. आमदार अश्विनी जगताप आणि शंकर जगताप यांनी घेतलेली आयुक्तांसोबतची बैठक आणि या बैठकीला उपस्थित असलेले सर्व इच्छुक माजी नगरसेवक हे चित्र पाहता आगामी काळात शंकर जगताप हेच ‘डिसिझन मेकर’ नेतृत्व म्हणून प्रभावी ठरतील, असे स्पष्ट संकेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button