breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारणसंपादकीय

ग्राऊंड रिपोर्ट : ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईरांच्या ‘जखमेवर मीठ’

राष्ट्रवादीच्या प्रचारप्रमुखपदी निवड : २००९ पासून शापित संघर्ष कायम

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून महाविकास आघाडीचा प्रचारप्रमुख म्हणून ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांची निवड करण्यात आली. २००९ पासून चिंचवडमध्ये विधानसभेचा खरा दावेदार असलेल्या भोईरांवर दिलेली जबाबदारी म्हणजे आजपर्यंत जगतापांविरोधात केलल्या संघर्षच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील अत्यंत निटनिटके आणि तितकेच अभ्यासू नेतृत्व म्हणून भाऊसाहेब भोईरांची ओळख जनमानसात आहे. राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक यासह व्यावसायिक क्षेत्रात राजकारणापलीकडे भाऊसाहेबांचा वकूब आहे. ओघवती वकृत्वकला, प्रभावी संभाषण कौशल्य आणि प्रशासकीय कारभाराची जाण असलेले भाऊसाहेबांचे नेतृत्व आत्मघातकी राजकारणामुळे शापित आहे. असा आतापर्यंतचा चिंचवडकरांचा अनुभव होता. त्यावर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शिक्कामोर्तब करण्यात आले.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सर्वपक्षीय शोकसभा झाली. शहरातील सर्व दिग्गजांनी आपले अनुभव आणि आठवणी कथन केल्या. त्यात भाऊसाहेबांचा अंतर्मनात खवळलेला समुद्र उफाळून आला होता.

‘‘२००९ पासून पक्षश्रेष्ठींनी कायम माझ्यावर अन्याय केला. ज्यांना अजित पवार यांनी ताकद दिली. पक्षाचे अधिकृत उमेदवार मी असताना अपक्ष उमेदवार निवडून आणला. त्यांनीच पक्षासोबत फारकत घेतली. दादांना माणसं ओळखता आली नाहीत’’ अशी खंत भाऊसाहेब जाहीरपणे बोलून दाखवतात. २००९ साली चिंचवड विधानसभा निवडणुकीत भाऊसाहेब भोईर यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीकडून काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. या निवडणुकीत अजित पवार यांनी आघाडी धर्म पाळला नाही. जगताप यांना अप्रत्यक्ष मदत करण्यात आली. त्यामुळे भाईर यांना पराभवाचा सामना करावा लागला. नंतरच्या काळात काँग्रेसमध्ये आहे, म्हणून भाईर राजकीयदृष्टया ‘साईट कॉर्नर’ झाले.
२०१४ मध्ये जगताप यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली. त्यावेळी आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीने या मतदारसंघावर दावा केला. त्यावेळी भाजपाकडून लक्ष्मण जगताप, राष्ट्रवादीकडून नाना काटे आणि शिवसेनेकडून राहुल कलाटे यांची तिरंगी लढत झाली. नाना काटे यांना तीन क्रमांकाची मते मिळाली होती.

२०१७ च्या महापालिका निवडणुकीपूर्वी भाऊसाहेब भोईर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काँग्रेसच्या काही नगरसेवकांसह प्रवेश केला. त्यावेळी आर्धी राष्ट्रवादी भाजपात प्रवेश करीत होती. त्या काळात भाईंरांनी राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. ज्या भागात भाजपाला मानणारा वर्ग आहे. त्या भागातून भाईर राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढले. त्यांना पराभव सहन करावा लागला. मात्र, स्वीकृत नगरसेवकपदासाठी त्यांना राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींचे उंबरे झिजवावे लागले होते. राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी आणि स्थानिक नेत्यांनी वेळोवेळी केलेल्या दगाफटकामुळे भाईरांच्या राजकीय वाटचालीत कायम अडथळे आलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे.

भाऊसाहेबांची ढाल चालते, नेतृत्व नको..?

वास्तविक, आताच्या पोटनिवडणुकीत भाईर राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी दावेदार होते. पण, नाना काटे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालण्यात आली. ज्या मतदार संघात लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात सर्वप्रथम दोन हात करण्याची तयारी भोईरांनी ठेवली. त्याच मतदार संघात जगताप यांच्या निधनानंतरसुद्धा उमेदवारी मिळाली नाही. याउलट ‘‘ तुम्ही केवळ चिंचवडपुरते मर्यादित आहात..’’ अशा शब्दांत निवडून येण्याची क्षमता नाही, अशी वागणूक देण्यात आली. त्याच भाऊसाहेब भोईरांना प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी राष्ट्रवादीला द्यावी लागते. भाऊसाहेबांची ढाल चालते, पण नेतृत्व नको…अशी संकूचित भूमिका राष्ट्रवादीला महागात पडणार आहे, असा ‘ग्राऊंड रिपोर्ट’ आहे. कारण, काँग्रेस, शिवसेनासह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये भाऊसाहेबांवर अन्याय झाल्याची भावना आहे.

भाऊसाहेब हुकमी इक्का नव्हे, शापित बादशाह…

कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना निवडून आणायचेच, या उद्देशाने राष्ट्रवादी कार्यरत झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादीचा हुकमी इक्का असलेले नेते भाऊसाहेब भोईर यांची प्रचार प्रमुख पदी निवड ही करण्यात आली आहे. असा दावा राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, भाऊसाहेब हुकमी एक्का नाहीत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संकुचित राजकारणाचा चिंचवड मतदार संघातील शापित बादशाह आहेत. त्यांच्या नेतृत्वाला, अनुभवाला २००९ पासून संधी मिळाली नाही. याउलट, वेळोवेळी त्यांना डावलण्यात आले. भाजपा आणि अपक्ष उमेदवाराच्या विरोधात ढाल म्हणून त्यांच्यावर निवडणूक प्रचाराची जबाबदारी सोपवली, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button