breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपुणे

हवामानातील बदलांच्या परिणामांबद्दल लोकअदालतला चांगला प्रतिसाद

पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी ।

हवामानातील बदलांमुळे येणारे पूर व दुष्काळ या समस्येवर उपाय सुचवणे व त्याची कार्यवाही करणे या हेतूने ‘तेर पॉलिसी सेंटर व एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ राजेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आलेल्या एक दिवसाच्या लोक अदालतला मंगळवारी चांगला प्रतिसाद मिळाला .
हा कार्यक्रम 4 ऑक्टोबर 2022 रोजी एमआयटी, कोथरूड, पुणे येथे सकाळी 10 ते संध्याकाळी 4 या वेळेत पार पडला. या सत्रात डॉ. राजेंद्रसिंह, समुद्र आणि पर्यावरणाचे अभ्यासक डॉ सुनील मुरलीधर शास्त्री, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते सारंग यादवडकर,पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे,ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार (संपादक,दैनिक सकाळ), शैलजा देशपांडे, विनोद बोधनकर , युक्रेन विद्यापीठाच्या प्रा.श्रीमती इरीना हे या लोकअदालत साठी उपस्थित होते.
निरुपमा कोचलकट्टा,निरंजन खैरे, प्रीती जोशी यांनी स्वागत केले. स्नेहा भोसले यांनी सूत्रसंचालन केले.डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले, ‘हवामान बदलाच्या ‘ ग्लोबल ‘ दुष्परिणामांवर ‘ लोकल ‘उपाय आवश्यक आहेत.
पूर्वी बिहार,बंगाल,ओरिसा येथेच पूर येत होते. आता ११ राज्यात पूरपरिस्थिती निर्माण होते. सर्व नैसर्गिक संपदेचे केंद्रीकरण करण्याच्या हव्यासाने हवामान बदल घडून येत आहे.अभयारण्ये एका बाजूला आणि खाणी त्यांच्या शेजारी उभ्या राहणे, चिंताजनक आहे.हवामान बदलाच्या दुष्परिणाम जागतिक पातळीवर असले तरी उपाय स्थानिक पातळीवर करता येण्यासारखे आहेत. मात्र, त्याचे धडे कोणत्याही अभ्यासक्रमात नाहीत.
कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, ‘ पर्यावरण संवर्धन ही जन चळवळ झाली पाहिजे. प्रत्येकाचा सहभाग असला पाहिजे. हिमालयावर, तेथील परिसंस्थेवर हवामान बदलाचे दुष्परिणाम होत आहेत.
सुनील शास्त्री म्हणाले, ‘ समुद्राच्या पाण्याचे वाफेत रूपांतर होण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाचे प्रमाण वाढले आहे. हवामान बदलामुळे कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जनाचे प्रमाण वाढले आहे.जमिन, हवा, पाणी दूषित होत आहेत. त्यावर काम करण्याची गरज आहे.
सारंग यादवाडकर म्हणाले, ‘पूर, दुष्काळ या समस्या नाहीत, समस्येची लक्षणे आहेत. समस्यांची मुळे शोधली पाहिजेत.खूप काही बिघडले आहे, जे दुरुस्त केले पाहिजे. तरूणाईने या समस्यांची मुळे समजावून घेऊन उपाययोजनांमध्ये योगदान दिले पाहिजे. शहरांमध्ये लोकसंख्येचे होणारे केंद्रीकरण धोकादायक ठरणार आहे.
श्रीराम पवार म्हणाले, ‘ इमारती वाढवून निसर्गाची हानी करुन उपयोग होणार नाही. पाणी वहनाचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. सरकारला दोष देऊन चालणार नाही.पर्यावरण जपले नाही, तर मतांवर परिणाम होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे.समाजाने त्याची जबाबदारी उचलली पाहिजे.

प्रदीप पुरंदरे म्हणाले, ‘पाणीप्रश्नावर, व्यवस्थापनावर सर्व विद्याशाखांच्या अभ्यासातून आलेल्या योजनांचा वेगवेगळा विचार न करता एकत्रित उपाययोजना केल्या पाहिजेत’. शैलजा देशपांडे म्हणाल्या, ‘ पुण्यात पुराचा धोका वाढत असून ३० टक्के प्रवाह, नाले अतिक्रमणाने नष्ट झाले आहेत. युक्रेन विद्यापीठाच्या प्रा.श्रीमती इरीना यांनीही जागतिक पातळीवर एकत्रित पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नांवर भर दिला.
या कार्यक्रमातून हवामान बदलाच्या वाढत्या परिणामांबद्दल लोकांच्या सूचना, उपाय यांचे मूल्यांकन आणि एकत्रीकरण करण्यात आले. आपत्ती कमी करण्यासाठी व्यावहारिक मार्ग शोधणे आणि जगभरातील निसर्गाचे पुनरुज्जीवन करण्यात मदत करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. जनता, प्रसारमाध्यमे, पर्यावरण संस्था, सरकार, समुदाय आणि सर्व संबंधित समाजातील घटकांशी संवाद साधून हे साध्य करायचे आहे. या संकटावर समुदाय आधारित उपाय शोधण्यासाठी जागतिक एकजुटीची नितांत गरज आहे. त्याबद्दल या लोक अदालतीमध्ये चर्चा झाली,असे डॉ विनिता आपटे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button