breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

माजी आमदार विलास लांडे यांची ‘‘राजकीय समयसूचकता’’!

  • प्रस्तावित विधी महाविद्यलयाला दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे नाव
  • शहराच्या सर्वसमावेशक नेतृत्वाची पोकळी भरुन काढण्याची संधी

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात सर्वसमावेश नेतृत्व करण्याची क्षमता असलेले नेते आणि भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. त्यानंतर आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी संपूर्ण शहराचे लक्ष पुन्हा एकदा वेधून घेतले.

दिवंगत लक्ष्मण जगताप आणि विलास लांडे यांनी मैत्री सर्वश्रृत आहे. आपल्या मैत्रीचे प्रतिक आणि जगताप यांच्या स्मरणार्थ डुडुळगाव-चऱ्होली येथे प्रस्तावित विधी महाविद्यालयाला जगताप यांचे नाव देण्याची घोषणा लांडे यांनी केली. या घोषणेचे सर्वपक्षीय नेत्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्वागत केले.

पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात आमदार जगताप यांनी सुमारे ३५ वर्षे कारकीर्द गाजवली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना नगरसेवक, स्थायी समिती सभापती, महापौर, विधान परिषद, आमदार अशी यशस्वी वाटचाल करणारे जगताप आणि लांडे समकालीन नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत असताना विलास लांडे- लक्ष्मण जगताप आणि संजोग वाघेरे या तीन मित्रांचा ‘लाजवा’ ग्रुप अत्यंत प्रभावी आणि चर्चेत होता. कालांतराने जगताप यांनी भाजपात प्रवेश केला. वाघेरे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष झाले आणि विलास लांडे यांना राष्ट्रवादीतील संघटनात्मक जबाबदाऱ्यांमधून ‘साईडकॉर्नर’ करण्यात आले. त्यानंतर शहराध्यक्षपदी नव्यांना संधी या सूत्रानुसार, अजित गव्हाणे यांच्याकडे जबाबदारी आहे. त्यामुळे विलास लांडे ‘मार्गदर्शक’ यादीत समावेश झाला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत सुमारे २५ वर्षे मानपान आणि नगरसेवक, महापौर, आमदार अशा सर्व मानाच्या पदांवर नाव कोरणारे विलास लांडे एकमेव आहेत. लांडे कुटुंबियांकडे महापालिका आणि शहरातील सर्वाधिक पदे भूषविण्याचा मान आहे. त्यामुळे लांडे खऱ्या अर्थाने शहराचे सर्वसमावेशक नेते आहेत. लांडे यांचा राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांसोबत सलोखा आहे. शहराचे प्रभावी नेते किंबहुना पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणातील ‘शरद पवार’ असाच त्यांचा लौकीक होता. पण, २०१४ पासून लांडे यांच्या राजकीय गडाला तडे जावू लागले. सुरूवातील विधानसभा निवडणुकीतील पराभव, त्यानंतर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या हातातून सत्ता गेली आणि २०१९ मध्ये पुन्हा विधानसभा निवडणुकीत पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला. त्यातच पक्षश्रेष्ठींकडून संघटनात्मक निर्णय प्रक्रियेतून त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे आता लांडे यांना राजकीय ‘कमबॅक’ची प्रतीक्षा होती.

दुसरीकडे, २०१४ पासून पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे वर्चस्व वाढू लागले. २०१७ मध्ये लक्ष्मण जगताप यांनी आमदार महेश लांडगे यांच्या जोडीने महापालिकेत सत्ता मिळवली. त्यावेळी जगताप भाजपाचे शहराध्यक्ष होते. किंबहुना, जगताप यांच्यामुळे शहरात भाजपा प्रभाव वाढला आणि सत्ताधारी पक्ष बनला. त्यामुळे लक्ष्मण जगताप त्याकारणाने शहराचे सर्वसमावेशक नेते म्हणून ओळखले जावू लागले. पिंपरी-चिंचवडचा नेता कोण? तर लक्ष्मण जगताप असा राज्यात दबदबा पहायला मिळाला.

दरम्यान, दिवंगत जगताप यांच्या निधननंतर चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली. या सभेत शहरातील सर्व नेत्यांसमोर लांडे यांनी स्वागतार्ह घोषणा करीत लक्ष वेधले. माजी आमदार विलास लांडे यांच्या राजमाता जिजामाता शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विधी महाविद्यालय प्रस्तावित आहे. या विद्यालयाला लांडे यांनी ‘‘दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप विधी महाविद्यालय’’ असे नाव देण्याची घोषणा केली. शहराच्या सर्वसमावेश नेतृत्वाला साजेसा निर्णय लांडे यांनी घेतला. हा निर्णय लांडे यांच्या राजकीय ‘कम बॅक’मध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राजकीय समयसूचकता… हेच लांडे यांच्या राजकीय प्रगल्भतेचे सूत्र आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकार नोंदवतात.


राष्ट्रवादीला सूचक इशारा…
विलास लांडे यांच्या विधी महाविद्यालयाच्या परवानगीसाठी दिवंगत आमदार जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस केली होती, याला स्वत: उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दुजोरा दिला. मध्यंतरी लांडे आणि भाजपा जवळीक अशी चर्चाही सुरू झाली होती. शिक्षण संस्थेच्या कामासाठी सीएम-डीसीएम यांची मदत झाली, असे लांडे यांनी प्रसारमाध्यमांत सांगितले होते. सर्वपक्षीय शोकसभेत त्यावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे ‘‘आपल्याला भाजपाचे वावडे नाही’’ असा सूचक इशारा लांडे यांनी आपल्या कृतीतून राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे विद्यमान शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांना आगामी अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागेल, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
**
अढळ मैत्रीचे प्रतिक… विधी महाविद्यालय ठरेल…
पिंपरी-चिंचवडच्या विकासात मोलाचे योगदान देणारे आमदार लक्ष्मण जगताप यांचे कार्य भावी पिढ्याना समजले पाहिजे, अशी अपेक्षा शोकसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती. तसेच, लांडे यांच्या निर्णयाचे स्वागतही केले. राजकारण आणि समाजकारणातील अढळ मैत्रीचे प्रतिक म्हणून डुडूळगाव येथे उभारण्यात येणारे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप विधी महाविद्यालय म्हणून ओळखले जाईल. पिंपरी-चिंचवडच्या राजकारणाला गावकी-भावकीची झालर आहे. नात्यागोत्या राजकारणात आजही आपलेपणा निश्चितपणे बघायला मिळतो. आता लांडे-जगताप यांच्या मैत्रीची ही ‘मिसाल’ भावी पिढ्यांना निश्चितपणे प्रेरणादायी ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button