TOP Newsताज्या घडामोडीपुणे

देशातील सर्वोत्तम शहर ठरण्यासाठी महापालिकेची अधिकारी-कर्मचाऱ्यांना सक्ती

पुणे : वास्तव्यासाठी देशातील सर्वोत्तम शहर (इज ऑफ लिव्हिंग) ठरविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सकारात्मक अभिप्राय देणे आवश्यक असताना हा निकष पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने चक्क महापालिकेच्या अठरा हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सकारात्मक अभिप्राय देणे सक्तीचे केले आहे. महापालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सकारात्मक अभिप्राय देण्याची सक्ती केल्याने नकारात्मक अभिप्राय येण्याची शक्यता धूसरच असून केवळ सक्तीने अभिप्राय घेऊन क्रमांक मिळविणारे शहर वास्तव्यासाठी सर्वोत्तम ठरेल का, असा प्रश्न उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे.

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडून वास्तव्यास सर्वोत्तम शहर (इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स) अंतर्गत शहर सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याबाबतचे निकष जाहीर करण्यात आले असून नागरिकांच्या दृष्टीने शहर कसे आहे, हा एक प्रमुख निकष आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून शहरातील जीवनमानाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांचे मत विचारात घेतले जाणार आहे. शहराला सन २०१८ मध्ये देशपातळीवर प्रथम क्रमांकाचे आणि २०१९ मध्ये दुसरा क्रमांक प्राप्त झाला होता. त्याअनुषंगाने वास्तव्यास सर्वोत्तम शहर म्हणून पुनश्च: प्रथम क्रमांक प्राप्त होण्यासाठी महापालिका प्रशासनाची धावपळ सुरू झाली असून त्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांना अभिप्राय देणे सक्तीचे करण्यात आले आहे. महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून तसे आदेश काढण्यात आले आहेत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यास अडचण येत असेल तर मराठी किंवा इंग्रजी भाषेत लिहिलेला अर्ज उप आयुक्त कार्यालयाकडे जमा करावा, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

शहरात राहणाऱ्या नागरिकांकडून जास्तीत जास्त सकारात्मक अभिप्राय मिळणे अपेक्षित असताना महापालिकेने मात्र अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला सक्ती केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या विरोधात अभिप्राय मिळण्याची शक्यता कमी आहे. महापालिकचे अठरा हजार कर्मचारी, पुणे महानगर परिवनह महामंडळ, स्मार्ट सिटी या संबंधित यंत्रणांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडूनही तसे अभिप्राय घेतले जाणार आहेत. सार्वजनिक वाहतूक, वीज वापर, परवडणारी घरे, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, सार्वजनिक स्वच्छता, महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा नागरिकांबरोबरच संवाद अशा वेगवेगळ्या सतरा प्रश्नांची उत्तरे यामध्ये द्यावी लागणार आहेत. हे सर्व प्रश्न महापालिकेशी संबंधित आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांकडून सकारात्मक अभिप्राय दिला जाण्याचीच शक्यता आहे.

अस्ताव्यस्त पडलेला कचरा, कोलमडलेली सार्वजनिक वाहतूक, शहराचे विद्रूपीकरण असे चित्र शहरात असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे यापूर्वी वेळोवेळी झालेल्या सर्वेक्षणात त्याबाबतची नाराजी नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली होती. नागरिकांचा अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याचा फटकाही महापालिकेला बसला होता. त्यामुळे प्रथम क्रमांक हवा असेल तर जास्तीत जास्त सकारात्मक अभिप्राय आवश्यक आहेत. त्यामुळेच अधिकाऱ्यांना ही सक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, अधिकारीही शहरातील नागरिक आहेत. त्यामुळे त्यांनी प्रतिसाद देणे चुकीचे नाही, असा दावाही प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

वास्तव्यास सर्वोत्तम शहरासाठी अभिप्राय देण्यासाठी नागरिकांना ULB code-802814 टाकून https://eol2022.org/citizenFeedback या संकेतस्थळावर जावे लागणार आहे. क्यू-आर कोडच्या माध्यमातूनही अभिप्राय देता येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button