TOP Newsताज्या घडामोडी

मानधनापेक्षा खर्च अधिक;अंगणवाडी सेविकांचा मतदार याद्यांच्या कामास नकार

मतदार यादीशी संबंधित कामात वार्षिक सहा हजार रुपये मानधन मिळते. अन्य कामांची जबाबदारी सांभाळून ते करताना मानधनापेक्षा कित्येक पट जास्त पैसे इंधन व तत्सम बाबींवर खर्च करावे लागतात. घरोघरी फिरतानाचे वेगळेच अनुभव येतात. ऑनलाईन पध्दतीने हे काम जमत नाही.अशा व्यथा मांडत नाशिक पश्चिम मतदारसंघात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून कार्यरत अंगणवाडी सेविकांनी या कामास नकार दिला आहे.मतदार याद्यांच्या कामातून आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार सिडको विभागातील ४० ते ५० अंगणवाडी सेविकांनी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्यासमोर मांडली. या संदर्भात निवेदन देऊन हे काम करणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. या मतदारसंघात एकूण ३७५ बीएलओ कार्यरत असून त्यात अंदाजे ८० अंगणवाडी सेविका आहेत. उर्वरित शिक्षक व अन्य विभागातील शासकीय कर्मचारी आहेत. मतदारांचे आधार संलग्नीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. मतदार यादी पुननिरीक्षण कार्यक्रमात मतदारांचे आधार क्रमांक, भ्रमणध्वनी, आवश्यक असल्यास छायाचित्र आदी संकलित करावे लागते.

दुपारी हे काम करताना अनेक नागरिक दरवाजे उघडत नाही. कुणी उघडले तर आम्हाला पाहुन दरवाजे लावून घेतले जातात. दुपारची वेळ आरामाची असल्याने प्रतिसाद मिळत नाही. यादीतील काही पत्ते सापडत नाही. अशा अडचणी अंगणवाडी सेविकांनी मांडल्या. शासकीय सेवेत ७० ते ८० हजार रुपये वेतन घेणाऱ्या शिक्षकांवर ही जबाबदारी सोपवावी, अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी केली. दरम्यान, आयोगाचे काम प्रत्येकावर बंधनकारक आहे. मानधनही आयोगाने देशपातळीवर निश्चित केलेले असल्याचे उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी स्पष्ट केले.

कामाचा बोजा, अडचणी काय ?
सकाळी आठ ते १२ अंगणवाडी घेतल्यानंतर कुपोषित बालक सर्वेक्षण, गृहभेटी आणि नंतर मतदार याद्यांचे हे काम करावे लागते. बहुतांश अंगणवाडी सेविकांचे वयोमान ५० वर्षापेक्षा अधिक आहे. कित्येकांना रक्तदाब, मधुमेह तत्सम विकार आहेत. मतदार यादीशी संबंधित कामे ऑनलाईन पध्दतीने करावी लागतात. सर्वांना ते जमत नाही. मिळणारे मानधन आणि त्यापेक्षा अधिक होणारा दैनंदिन खर्च यांचा कुठेही ताळमेळ नाही. या सर्व कारणांनी मतदार याद्यांचे काम करणे शक्य नसल्याचा पवित्रा अंगणवाडी सेविकांनी घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button