TOP Newsताज्या घडामोडीपुणे

आंबिल ओढा परिसरातील कामे तीन वर्षांनंतरही संथ गतीने

पुणे : शहरातील आंबिल ओढ्यालगतच्या परिसरात विशेषत: दांडेकर पूल, दत्तवाडी परिसरात रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण झाली. २५ सप्टेंबर २०१९ मध्ये याच भागात ढगफुटीप्रमाणे झालेल्या पावसाने हाहाकार उडवून दिला होता. त्यात काही नागरिक आणि जनावरेही दगावली होती. शेकडो वाहनांचे नुकसान झाले होते. त्यामुळे या परिसरात उपाययोजनांची विविध कामे हाती घेण्यात आली असली, तरी संथ गतीमुळे तीन वर्षांनंतरही ती पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे प्रत्येक पावसात या भागातील नागरिकांमध्ये भीती पसरते. रविवारीही हीच स्थिती निर्माण झाली होती.

कात्रज येथे उगम पावणाऱ्या आंबिल ओढा परिसरात तीन वर्षांपूर्वी आलेल्या महापुरात जीवित आणि वित्तहानी झाली होती. सहकारनगर, महेश सोसायटी परिसर, अरणेश्वर, ट्रेझर पार्क परिसर, टांगेवाला काॅलनीमधील अनेक इमारतींना पुराचा तडाखा बसला होता. अनेक इमारतींच्या सीमाभिंती वाहून जाण्याच्या, त्या खचण्याचे प्रकार घडले होते. दुचाकी आणि चारचाकी वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानंतर महापालिकेने आंबिल ओढ्यालगत अनेक कामे करण्याचे प्रस्तावित केले. आंबिल ओढ्याला आलेल्या पुरानंतर प्रायमूव्ह या संस्थेकडून सर्वेक्षण करण्यात आले. आंबिल ओढ्यालगत झालेल्या अनधिकृत बांधकामांमुळे पुराचा धोका निर्माण झाल्याचे या सर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आले होते.

आंबिल ओढ्याचे खोलीकरण तसेच रुंदीकरण करण्याबरोबरच परिसरात कल्व्हर्ट उभारणे, सीमाभिंती बांधणे, जलवाहिन्यांचे स्थलांतर करणे अशी कामे करण्याचे प्रस्तावित करण्यात आले. त्यासाठी ३५० कोटींचा आराखडाही करण्यात आला. मात्र तीन वर्षांनंतरही ही कामे संथ गतीने सुरू आहेत. त्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिकांनी सातत्याने तक्रारी केल्या आहेत. मात्र महापालिकेच्या निष्क्रियतेचा फटका आंबिल ओढा परिसरातील नागरिकांनी बसत आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. पुण्यातही मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button