ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर, मुलगी ईशा देओलने दिली माहिती

Dharmendra Health Update | बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (वय ८९) यांची प्रकृती सध्या स्थिर असून ते हळूहळू बरे होत आहेत. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात मागील १२ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या दोन दिवसांत त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याच्या बातम्या पसरल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंता वाढली होती.
दरम्यान, धर्मेंद्र यांच्या आरोग्याबाबत सोशल मीडियावर त्यांच्या निधनाच्या अफवाही पसरू लागल्या होत्या. मात्र, त्या पूर्णतः खोट्या असल्याचं त्यांच्या मुलगी आणि अभिनेत्री ईशा देओलने स्पष्ट केलं आहे. ईशा देओलने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “माझ्या वडिलांची प्रकृती स्थिर आहे आणि ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत. कृपया आधार आणि प्रार्थना करत राहा. आमच्या कुटुंबाला प्रायव्हसी द्यावी, ही विनंती.”
हेही वाचा : शेतकरी आता हायड्रोजनदाता होणार; नितीन गडकरींनी लातूरमधून बळीराजाला दिला प्रगतीचा मंत्र
धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडल्याची माहिती कळताच सलमान खान, शाहरुख खान, अमीषा पटेल, गोविंदा यांसारख्या अनेक कलाकारांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. तसेच धर्मेंद्र यांच्या पत्नी व अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं सांगितलं होतं.
धर्मेंद्र यांनी ‘शोले’मधील ‘वीरू’सह अनेक अविस्मरणीय भूमिका साकारत हिंदी चित्रपटसृष्टीत खास स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्या प्रकृतीविषयी अधिकृत माहिती कुटुंबीयांकडून येत आहे आणि सध्या स्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात येत आहे. चाहत्यांनीही सोशल मीडियावरून धर्मेंद्र यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना व्यक्त केली आहे.





