Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

१९९० च्या आर्थिक संकटाची कहाणी मोठ्या पडद्यावर; मनोज बाजपेयीचा ‘गव्हर्नर’ चर्चेत

Manoj Bajpayee: अभिनेता मनोज बाजपेयीचा आगामी ‘गव्हर्नर’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. १९९० साली भारतावर आलेल्या आर्थिक संकटावर आधारित ही कथा असल्यामुळे चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे.

‘गव्हर्नर’ हा चित्रपट सत्य घटनांपासून प्रेरित असल्याचं सांगितलं जात आहे. त्या काळात देश आर्थिक अडचणीत सापडला होता आणि भारत दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. ट्रेलरमध्ये त्या काळातील तणावपूर्ण वातावरण, लोकांची चिंता आणि देशासमोर उभे राहिलेले मोठे प्रश्न दाखवण्यात आले आहेत.

चित्रपटात मनोज बाजपेयी ‘गव्हर्नर’च्या भूमिकेत दिसणार आहेत. देशाची परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या गंभीर आणि जबाबदार व्यक्तीची भूमिका ते साकारत आहेत. ट्रेलरमध्ये त्यांचे संवाद आणि अभिनय प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. अभिनेत्री अदा शर्मा देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. दोघांची जोडी प्रेक्षकांना आवडत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा –  महायुतीत भाजप ११ तर मित्र पक्षांना सहा जागा; विधान परिषदेसाठी तोडगा

ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात मनोज बाजपेयी यांनी चित्रपटाशी संबंधित काही खास आठवणी सांगितल्या. त्यांनी सांगितलं की, निर्माता विपुल अमृतलाल शाह यांच्यासोबत काम करण्याची इच्छा त्यांची अनेक वर्षांपासून होती. जवळपास साडेचार वर्षांपूर्वी या चित्रपटासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता.

मनोज बाजपेयी म्हणाले की, “मी जेव्हा या चित्रपटाची स्क्रिप्ट पहिल्यांदा वाचली, तेव्हाच खूप उत्साहित झालो होतो.” कथा इतकी प्रभावी होती की त्यांनी लगेच चित्रपटासाठी होकार दिला. त्यांच्या मते, हा फक्त आर्थिक किंवा राजकीय विषयावरचा चित्रपट नाही, तर त्या काळातील लोकांच्या भावना आणि परिस्थितीही यात दाखवण्यात आली आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर यांनी केले आहे. तर विपुल अमृतलाल शाह हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. सुवेंदू भट्टाचार्य, सौरभ भारत, रवि असरानी आणि विपुल अमृतलाल शाह यांनी मिळून चित्रपटाची कथा लिहिली आहे. गीतकार जावेद अख्तर यांनी गाणी लिहिली असून अमित त्रिवेदी यांनी संगीत दिले आहे.

‘गव्हर्नर’ हा चित्रपट सनशाईन पिक्चर्सच्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. हा चित्रपट १२ जून २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button