ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र

सूरज चव्हाणचा ‘राजा राणी’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

चित्रपट समाजासाठी घातक समाजामध्ये चुकीचा संदेश, कायदेशीररित्या बंदी घातली जाईल

बारामती : बारामतीच्या सूरज चव्हाणने ‘बिग बॉस मराठी 5’चं विजेतेपद पटकावलं. या मोठ्या विजयानंतर त्याचा ‘राजा राणी’ हा चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र सूरजचा हाच चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘राजा राणी’ हा चित्रपट समाजासाठी घातक असून या चित्रपटातून समाजामध्ये चुकीचा संदेश जात आहे, असा आरोप वकील वाजिद खान (बिडकर) यांनी केला आहे. इतकंच नव्हे तर सूरजच्या या चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी नाहीतर न्यायालयाचे दरवाजे ठोठावून चित्रपटावर कायदेशीररित्या बंदी घातली जाईल, असा निर्वाळीचा इशारा त्यांनी दिला आहे.

“बिग बॉस मराठीनंतर सूरज चव्हाणच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली आहे. सोशल मीडियावर अनेकजण त्याला फॉलो करतात. पण त्याचा ‘राजा राणी’ हा त्याचा चित्रपट पाहून अनेक तरुण-तरुणी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू शकतात. याची शक्यता नाकारता येत नाही. चित्रपटाच्या शेवटी असं दाखवण्यात आलं आहे की समाज आणि नातेवाईकांमुळे चित्रपटातील दोन प्रेमी एकत्र येऊ शकत नाहीत. म्हणून चित्रपटातील अभिनेता आणि अभिनेत्री टोकाचं पाऊल उचलत एकमेकांवर गोळ्या झाडून आत्महत्या करतात. असा चुकीचा संदेश चित्रपटाच्या सरतेशेवटी देण्यात आलेला आहे, तो अत्यंत चुकीचा आहे,असं वाजिद खान यांनी म्हटलंय.

सूरज हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असल्याने अनेकजण त्याला फॉलो करतात. ‘बिग बॉस मराठी 5’नंतर त्याच्या फॉलोअर्सचा आकडा आणखीनच वाढला आहे. त्यामुळे त्याच्या चित्रपटात ज्याप्रकारची कथा दाखवली आहे, त्याचं अनुकरण खऱ्या आयुष्यातही फॉलोअर्सकडून होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. म्हणूनच या चित्रपटावर बंदी आणावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या चित्रपटात अभिनेता रोहन पाटील, अभिनेत्री वैष्णवी शिंदे यांच्या मुख्य भूमिका आहेत. सोनाई फिल्म क्रिएशन प्रस्तुत ‘राजा राणी’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन आणि निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केली आहे. तर चित्रपटाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केलं आहे.

सूरज चव्हाणचा अभिनय असलेला ‘राजा राणी’ हा चित्रपट 18 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. ग्रामीण आणि सत्य प्रेमकहाणीवर आधारित असलेला हा चित्रपट तीनशेहून अधिक थिएटरमध्ये आणि चारशेहून अधिक शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button