सचिन पिळगावकरांनी सांगितला विठुरायाच्या मंदिरातील अविस्मरणीय अनुभव
'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद' च्या संपूर्ण टीमचे वडाळा विठ्ठल मंदिरात जाऊन देवाचं दर्शन
मुंबई : सचिन पिळगावकर हे मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मोठ्या प्रमाणात मनोरंजन केलंय आणि अजूनही करत आहेत. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘गंमत जंमत’ यांसारखे अनेक चित्रपट सचिन यांनी दिग्दर्शित केले असून आजही हे चित्रपट लोकप्रिय आहेत. सध्या सचिन पिळगावकर स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ या रिऍलिटी शोच्या तिसऱ्या पर्वामध्ये परीक्षक म्हणून आहेत. आषाढी एकादशी जवळ येत आहे आणि अनेक वारकरी पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीसाठी जात आहेत. सचिन पिळगावकर यांनीसुद्ध आणि ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ च्या संपूर्ण टीमने वडाळा येथील विठ्ठल मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर सचिन यांना आलेल्या विलक्षण अनुभवाबद्दल त्यांनी सांगितलं आहे.
सचिन यांना वडाळा येथील विठ्ठल मंदिरात एक आजी भेटल्या. त्या आजींनी अगदी लहान मुलाला गोंजारतात त्याप्रमाणे सचिन यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवत त्यांचं कौतुक केलं. या अनुभवाबद्दल सांगतात सचिन म्हणाले की, ‘माझं बालपण वडाळ्याला गेलं. माझ्या आईचे, आई – वडील म्हणजे माझे आजी – आजोबा वडाळा येथील सहकार नगरमध्ये राहायचे. मी लहानपणी आजी – आजोबांकडे जायचो, लाडू खायचो. आजोबा मला गोष्टी सांगायचे. त्या सहकार नगरमध्ये एक बाई होत्या. त्या बाईंनी कायम माझ्यावर आईप्रमाणे माया केली. त्या बाईंची भेट आज या मंदिरात झाली. योगायोग म्हणावा की, विठ्ठलाची कृपा! त्यांचा आशीर्वाद मला पुन्हा एकदा लाभला.’
सचिन पिळगावकर यांच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचं तर, त्यांच्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची उत्सुकता सर्वच चाहत्यांना आहे. सचिन यांच्या दिग्दर्शनाचं एक उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट! हा चित्रपट हिंदी सिनेमावर आधारित असून बॉलिवूडमध्ये हा चित्रपट फ्लॉप ठरला. मात्र, मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे सचिन कोणता नवा चित्रपट घेऊन येतात याबद्दल प्रेक्षकांच्या मनात कायम औत्सुक्य निर्माण झालेलं असतं.