The Kerala Story : ‘द केरला स्टोरी’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा : आमदार महेश लांडगे
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणी : महायुतीच्या सत्ताकाळात ‘लव्ह जिहाद’ला आळा बसावा!
![Make the movie 'The Kerala Story' tax free in Maharashtra: MLA Mahesh Landge](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/Mahesh-Landge-780x470.jpg)
पिंपरी । देशात ‘लव्ह जिहाद’अंतर्गत हिंदू व ख्रिश्चन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अत्याचाराला बळी पडणाऱ्या मुलीच्या जीवनावर आधारित सत्य ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट आहे. तो संपूर्ण महाराष्ट्रात करमुक्त करावा, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणीचे पत्र पाठवले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, भारतात ‘लव जिहाद’ ला बळी पडलेल्या हिंदू व ख्रिश्चन मुलींचे वास्तव चित्रण करणारा ‘द केरला स्टोरी’ हा मध्यप्रदेश सरकारने करमुक्त केला आहे. या सिनेमामधील हिंदू समाजावरील मुलींवर जिहादी मानसिकता असणाऱ्या लोकांनी अनन्वित अत्याचार करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करून आयुष्यातून कशा पद्धतीने उध्वस्त केले जाते, याचे योग्य आणि खरे चित्रीकरण केले आहे.
‘द केरला स्टोरी’ या हिंदी चित्रपटामुळे लव्ह जिहादचे वास्तव खऱ्या अर्थाने उजेडात आले आहे. हा चित्रपट जास्तीत जास्त हिंदू बांधवांपर्यंत पोहोचवा. सदर चित्रपट प्रत्येकाने पहावा हा हेतू लक्षात घेऊन राज्य सरकारने या चित्रपटाला करमुक्त करावे, अशी आग्रही मागणी सर्व हिंदू समाज बांधवांच्या वतीने करीत आहोत.
महायुतीच्या काळात ‘लव्ह जिहाद’ला आळा बसावा : आमदार लांडगे
‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट महाराष्ट्रातील जनतेने अधिकाधिक पाहता यावा. याकरिता हा चित्रपट लवकरात लवकर करमुक्त करावा, अशी भावना सर्वसामान्य नागरिकांची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील जिल्ह्याजिल्ह्यात ‘लव्ह जिहाद’च्या घटना समोर येतात. याविरोधात राज्यभरामध्ये ठिकठिकाणी हिंदूत्ववादी संघटना, संस्थांनी मोर्चे, आंदोलने केली आहेत. तसेच, राज्यात लव्ह जिहाद कायदा व्हावा यासाठी विधिमंडळ अधिवेशनात देखील हा मुद्दा मांडण्यात आला होता. आपल्या सरकारच्या काळात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ‘लव्ह जिहाद’ला आळा बसेल आणि पीडित हिंदू मुलींना न्याय मिळावा, अशी अपेक्षाही आमदार लांडगे यांनी व्यक्त केला आहे.