#CoronaVirus: कोरोनामुळे झाला विनोदी अभिनेत्याचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Ken-Shimura-.jpg)
करोना विषाणूमुळे संपूर्ण जगात सध्या भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. २०० पेक्षा अधिक देशांमध्ये पसरलेल्या या विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. सर्वसामान्य लोकांपासून अगदी सुरक्षित क्षेत्रात राहणाऱ्या सेलिब्रिटींपर्यंत कोणालाही करोनाने सोडलं नाही. दरम्यान जॅपनीस अभिनेता केन शिमुरा यांचा करोना विषाणूची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला आहे.
केन शिमुरा जापानी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता होते. ते प्रामुख्याने आपल्या विनोदी अभिनयासाठी प्रसिद्ध होते. ७० वर्षीय केन २३ मार्चला करोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात भरती झाले होते. मात्र त्यांचे शरीर डॉक्टरांच्या उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. सात दिवसांच्या संघर्षानंतर अखेर केन यांची प्राणज्योत मावळली.
‘पोपोया’, ‘काटो चॅन केन’, ‘शिमुरा केन बाकाटोनोसामा’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. ‘डोरीफू डायबकुश’ या विनोदी मालिकेमुळे ते पहिल्यांदा प्रकाशझोतात आले होते. अभिनयासोबतच ते उत्तम लेखकही होते. त्यांनी अनेक जॅपनीस विनोदी मालिकांच्या पटकथा लिहिल्या आहेत. केन शिमुरा यांच्या मृत्यूमुळे जापानी सिनेसृष्टीत एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे चाहते सोशल मीडियावरुन शोक व्यक्त करत आहेत.