बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू रक्षा मोर्चा

पुणे : बांगलादेशातील हिंदू बांधवांवरील होणार्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने पुण्यात हिंदू रक्षा मोर्चा काढण्यात आला. पुण्यासह राज्याच्या विविध भागांत मोर्चा, आंदोलन करून या घटनेचा निषेध करण्यात आला.
पुण्यात गंज पेठेतील लहुजी वस्ताद साळवे तालीमपासून निघालेला हा मोर्चा मीठगंज पोलीस चौकी, शितळादेवी चौक, पंचमुखी मारुती मंदिर, शुक्रवार पेठ पोलीस चौकी, कासट चौक, तांबोळी मशीद, सोन्या मारुती चौक, विजया मारुती चौक, पासोड्या विठोबा चौकातून संत नामदेव महाराज चौक, रविवार पेठ असा निघाला.
हेही वाचा – डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला इतिहास!
बांगलादेश निर्माण झाल्यानंतर ठरलेल्या कराराप्रमाणे त्या देशातील धार्मिक स्थळे, तसेच अल्पसंख्यांक नागरिक सुरक्षित राहतील, या अपेक्षेने हजारो हिंदू कुटुंबीय बांगलादेशमध्ये स्थिरावले. मात्र, या अपेक्षांचा भंग झाल्याचे सध्या दिसून येत आहे. अल्पसंख्यांक हिंदू समाजावर वारंवार अत्याचाराच्या घटना घडत आहेत. हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली पुरातन मंदिरांची, मूर्तीची तोडफोड केली जात आहे. हिंदू महिलांवर बलात्कार केले जात आहेत. तसेच त्यांच्यावर अमानुष अत्याचार करून ठार मारण्यात येत आहे.
हिंदूंच्या तसेच दलित बांधवांच्या मालमत्ता जमिनी अवैद्य मार्गाने बळकावून तसेच त्यांना बेघर केले जात आहे. हे अत्याचार थांबले नाहीत, तर आगामी काळात सकल हिंदू समाज ठोकमोर्चा, तसेच उग्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला.





