‘बिग बॉस 19’ फेम तान्या मित्तल वादाच्या भोवऱ्यात
तान्या मित्तल हिच्याविरोधात ग्वाल्हेर येथे तक्रार दाखल
मुंबई : ‘बिग बॉस 19’ या वादग्रस्त शोमुळे कायम चर्चेत राहणारी स्पर्धक तान्य मित्तल हिच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. तान्या मित्तल हिच्याविरोधात ग्वाल्हेर येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तान्या हिच्यावर पोटोश गन चालवण्याचे आरोप आहे. सध्या तान्या हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, तिच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आणि एफआयआरची मागणी करण्यात आली. एसएसपींनी आता या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
तक्रारदाराने काय म्हटलं?
सध्या बिग बॉस 19 मध्ये सहभागी असणारी तान्या मित्तलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने गुलाबी साडी नेसली आहे. तान्या व्हिडीओ कार्बाइड गन चालवताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली आणि तिच्याविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली.
ग्वाल्हेरचे रहिवासी शिशुपाल सिंह कंशाना यांनी एएसपी अनु बेनीवाल यांच्याकडे तक्रार केली आहे. ज्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या सूचना आणि कलम 163 बीएनएस अंतर्गत जिल्हाधिकारी रुचिका चौहान यांनी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचा हवाला देत एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.
काय आहे व्हिडीओचं सत्य?
व्हिडीओमध्ये तान्या मित्तल जी बंदूक चावताना दिसत आहे, ही तीच बंदूक आहे जिच्या वापरावर ग्वाल्हेर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. हा व्हिडिओ मागील वर्षीचा, म्हणजे 2024 चा असल्याचं सांगितलं जात आहे. जिल्हाधिकारी रुचिका चौहान यांच्या आदेशानुसार सध्या चौकशी सुरू आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मध्य प्रदेशात कार्बाइड गनच्या गोळीबारामुळे आतापर्यंत 300 हून अधिक लोकांची दृष्टी धोक्यात आली आहे. ज्यामुळे सरकारकडून या बंदूकीवर बंदी घालण्यात आली आहे. याच दरम्यान, कार्बाइड गनचा वापर करताना तान्या हिचा व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यामुळे अभिनेत्रीच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
असं देखील म्हटलं जात आहे की, जर तपासात हा व्हिडिओ गेल्या वर्षीचा असल्याचं आढळून आलं तर तिच्याविरुद्ध एफआयआर दाखल होण्याची शक्यता नाही, कारण गनवर अलीकडेच बंदी घालण्यात आली आहे.




