‘कुमकुम भाग्य’, ‘छावा’ फेम २२ वर्षीय अभिनेत्री संचिता उगलेची आत्महत्या

Sanchita Ugale | मनोरंजन विश्वातून एक अत्यंत खळबळजनक आणि अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. ‘कुमकुम भाग्य’, ‘वागले की दुनिया’ यांसारख्या लोकप्रिय मालिका आणि विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या आगामी ‘छावा’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारी तरुण अभिनेत्री संचिता उगले हिने वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी आत्महत्या केली आहे. नालासोपारा येथील राहत्या घरात रविवारी संध्याकाळी ६:३० ते ७:३० च्या सुमारास तिने हे टोकाचे पाऊल उचलले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संचिता नालासोपारा येथील आचोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपले आई-वडील आणि १५ वर्षांच्या लहान बहिणीसोबत राहत होती. रविवारी संध्याकाळी ५:३० च्या सुमारास तिची लहान बहीण अंजली काही कामासाठी घराबाहेर गेली होती. घरात कोणीही नसताना संचिताने बेडरूममध्ये छताच्या पंख्याला साडीने गळफास लावून आपले जीवन संपवले.
बहीण घरात परतल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कुटुंबीयांनी स्थानिकांच्या मदतीने तिला तातडीने महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.
हेही वाचा
दीप्ती शर्माचे २ ऐतिहासिक जागतिक रेकॉर्ड! पाकिस्तानचा धुव्वा उडवत जागतिक क्रिकेटमध्ये रचला इतिहास
सुसाईड नोट नाही, पोलिसांकडून तपास सुरू
आचोले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून त्यांना तिथे कोणतीही सुसाईड नोट (Suicide Note) मिळालेली नाही. त्यामुळे संचिताने एवढ्या लहान वयात आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस सध्या तिच्या कुटुंबीयांची आणि मित्रपरिवाराची चौकशी करत असून या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
‘छावा’ चित्रपटात साकारली होती महत्त्वाची भूमिका
संचिता उगले ही टीव्ही विश्वातील एक उमती आणि लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या आणि बहुप्रतिक्षित विकी कौशल स्टारर ‘छावा’ चित्रपटात ‘ताराबाई’ यांची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. याशिवाय तिने ‘दिलवाली दूल्हा ले जाएगी’ या चित्रपटात ‘सुकून’ नावाचे पात्र साकारले होते. ‘कुमकुम भाग्य’ आणि ‘वागले की दुनिया’ या प्रसिद्ध टीव्ही मालिकांमधील तिच्या कामाचे कौतुक झाले होते. तिच्या अशा अचानक जाण्याने टीव्ही आणि चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली असून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.





