हॉकीनंतर फूटबॉल खेळण्यासा सागरिका घाटगे सज्ज!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/sagarika-ghatge-759.jpg)
‘चक दे इंडिया’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री म्हणजे सागरिका घाटगे. सागरिका या चित्रपटातील प्रीती सबरवालच्या भूमिकेतून घराघरात पोहोचली. आता सागरिका पुन्हा एकदा एका अनोख्या खेळाडूच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच आहे.
सागरिकाने इन्स्टाग्राम खात्यावर तिच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटाचे नाव ‘मान्सून फुटबॉल’ आहे. या पोस्टरमध्ये सागरिकाने हिरव्या रंगाची साडी परिधान केली असून ती फूटबॉलसह उभी असल्याचे दिसत आहे. दरम्यान बाजूला पाऊस देखील पडत असल्याचे दिसत आहे. या लूकमध्ये सागरिका अत्यंत ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. तिचे हे पोस्टर सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाले आहे.
काही दिवसांपूर्वीच सागरिकाचा फूटबॉल खेळतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर तो व्हिडीओ सागरिकाच्या आगामी चित्रपटाच्या संबंधीत असू शकतो असे अनुमान लावले जात होते. मिलिंद उके यांच्या ‘मान्सून फुटबॉल’ चित्रपटात सागरिका घाटगेसह विद्या माळवदे, चित्राशी रावत, प्रितम कागणे आणि सीमा आझमी यांच्यादेखील महत्वपूर्ण भूमिका असणार आहेत.
‘मान्सून फुटबॉल’ चित्रपटात या सर्व अभिनेत्री साडी नेसून आणि स्पोर्ट्स शूज घालून फुटबॉल खेळताना दिसणार आहेत. मध्यमवर्गीय गृहिणी या त्यांच्या नेहमीच्या जीवनशैलीतील गोष्टींना कंटाळलेल्या असतात आणि फुटबॉल हे त्यांचे पॅशन असते. या सर्व महिला एकत्र येऊन त्यांच्या आयुष्यातील कंटाळवाणेपणा कसा दूर करतात आणि फुटबॉल खेळण्याच्या जिद्दीला कशा पूर्णत्वाला नेतात याचे चित्रण या चित्रपटात आहे. ‘मान्सून फुटबॉल’ हा स्त्रीप्रधान चित्रपट आहे.