सलमानच्या घराबाहेर निदर्शने करणाऱ्या २० जणांना अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/salman-khan-2.jpg)
अभिनेता सलमान खान सूत्रसंचालन करत असलेला ‘बिग बॉस १३’ हा रिअॅलिटी शो सध्या फार चर्चेत आहे. यंदाच्या पर्वातील काही नियमांवर करणी सेनेने आक्षेप घेतला असून सलमानच्या ‘गॅलेक्सी’ या निवासस्थानाबाहेर त्यांनी निदर्शने केली. निदर्शने करणाऱ्या २० जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्याचसोबत सलमानच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. करणी सेनेने ‘बिग बॉस’ या शोवर बंदी आणण्याची मागणी केली होती. हा शो हिंदू संस्कृतीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करणी सेनेने केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रसुद्धा लिहिलं होतं.
‘बिग बॉस’चं तेरावं पर्व सध्या जोरदार चर्चेत असून सोशल मीडियावरही #BanBiggBoss हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे. या तेराव्या पर्वात शोच्या काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत आणि हे नियम प्रेक्षकांना रुचले नाहीत. ‘बिग बॉस १३’मध्ये BFF (बेस्ट फ्रेंड्स फॉरेव्हर) ही नवीन संकल्पना मांडण्यात आली. यानुसार स्पर्धकांना त्यांच्या जोड्या सुरुवातीला निवडण्यास सांगितल्या. संपूर्ण सिझनमध्ये संबंधित जोड्या एकाच बेडवर झोपणार आहेत. यामध्ये काही महिला स्पर्धकांनी पुरुष स्पर्धकाला जोडीदार म्हणून निवडलं. त्यामुळे महिला व पुरुषाने एकाच बेडवर झोपणं हे कितपत योग्य आहे असा प्रश्न विचारत काही प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे. शोमध्ये दाखवण्यात येणाऱ्या सीनवर आक्षेप घेत प्रेक्षकांनी सोशल मीडियावर #BoycottBiggBoss हा हॅशटॅग वापरत विरोध केला आहे.
करणी सेनेनं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहित हिंदू कायद्यानुसार त्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. या शोसोबतच सूत्रसंचालक सलमान खानवरही कारवाई करण्यात यावी, कारण शोच्या माध्यमातून लव्ह-जिहाद पसरवण्यात व हिंदू संस्कृतीची प्रतिमा मलिन करण्यात त्याचाही मोठा वाटा आहे, असं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.