‘शोले’मध्ये गब्बरच्या भूमिकेसाठी ‘या’ अभिनेत्याला होती पहिली पसंती

आजही बॉलिवूडमध्ये खलनायकाची भूमिका म्हटले की दिवंगत अभिनेते अमजद खान डोळ्यासमोर उभे राहतात. अभिनेते अमजद खान हे खलनायकाच्या भूमिंकासाठी जास्त लोकप्रिय होते. मात्र अमजद खान यांना इंडस्ट्रीमधील खलनायक म्हटल्यावर राग येत असल्याचे म्हटले जाते. अमजद खान यांचा बॉलिवूड इंडस्ट्रीमधील प्रवास अतिशय संस्मरणीय होता. या खलनायकाने १९९२ साली जगाचा निरोप घेतला.
अमजद यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९४० रोजी झाला होता. आज अमजद खान यांची जयंती आहे. अमजद खान हे मुंबई यूनिवर्सिटीचे टॉपर असल्याचे फार कमी लोकांना माहिती आहे. त्यांना हिंदी, उर्दू आणि पर्शियन भाषांचे खूप ज्ञान होते. त्यांचा मुलगा शादाब खानने एका मुलाखतीमध्ये अमजद हे मुंबई यूनिवर्सिटीमधील पर्शियनचे टॉपर असल्याचे म्हटले होते.
गब्बर सिंह या भूमिकेसाठी सुरुवातीला अभिनेता डॅनी डेंग्जोग्पाची निवड करण्यात आली होती. डॅनी यांनी या भूमिकेसाठी होकारही कळवला होता. पण डॅनी त्यावेळी फिरोज खान यांचा बिग बजेट चित्रपट ‘धर्मात्मा’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र होते. त्यामुळे दोन्ही चित्रपटांना वेळ देणे त्यांना शक्य नव्हते. म्हणून नंतर आम्ही अमजद खान यांची निवड केली असल्याचा खुलासा सिप्पी यांनी केला होता.





