विराट कामगिरी करणारा कोहली आता ‘सुपरहिरो’ आवतारात
सुपरहिरो म्हटले की चटकन आपल्या डोळ्यांसमोर ‘सुपरमॅन’, ‘बॅटमॅन’, ‘आयर्नमॅन’, ‘हल्क’ अशी काही नावे येतात. परंतु या पाश्चिमात्य सुपरहिरोंना टक्कर देण्यासाठी आता एक देसी सुपरहिरो सज्ज झाला आहे. या सुपरहिरोचे नाव ‘सुपर व्ही’ (Super V) असे आहे. गंमतीशीर बाब म्हणजे हा सुपरहिरो भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहलीच्या आयुष्यावर आधारित आहे.
आज विराट कोहलीचा ३१वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘सुपर व्ही’ मालिकेचा पहिला भाग स्टार प्लस, स्टार स्पोर्ट्स, डिस्ने आणि मार्व्हल या वाहिन्यांवर दुपारी साडेतीन वाजता प्रदर्शित केला जाईल. तसेच हॉटस्टार या अॅपवर देखील ही मालिका प्रेक्षकांना पाहता येऊ शकते.
‘सुपर व्ही’ (Super V) ही एक अॅनिमेटेड मालिका आहे. ५ ते १५ वर्षांच्या मुलांसाठी या मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. यात विराटच्या बालपणीचे किस्से दाखवले जाणार आहेत. विषेत: विराटच्या माध्यमातून लहान मुलांना प्रेरित करण्यासाठी या मालिकेची निर्मिती केली गेली आहे.