लोकसभा निवडणुकीतील प्रचार पडला महागात; अभिनेत्री स्वरा भास्करला गमावल्या लागल्या जाहिराती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/swara-.jpg)
समाजात घडणाऱ्या विविध घटनांवर सामाजिक माध्यमांतून भाष्य करणारी अभिनेत्री म्हणजे स्वरा भास्कर. यंदा पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान स्वरा कन्हैय्या कुमारचा प्रचार करताना दिसली होती. मात्र हा प्रचार करणं तिला चांगलचं महागात पडलं. निवडणुकीचा प्रचार केल्यामुळे तिला चार मोठ्या ब्रॅण्डच्या जाहिराती गमवाव्या लागल्या. याविषयीचा खुलासा तिने नुकताच केला आहे.
यंदा पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्वरा बिहारमधील बेगूसुराई लोकसभा मतदार संघात कन्हैय्या कुमारचा प्रचार करत होती. मात्र हा प्रचार केल्यामुळे तिला तीन इव्हेंटमधून काढून टाकण्यात आलं. ‘शीर कोरमा’ या आगामी चित्रपटाच्या पोस्टर प्रदर्शनावेळी तिने ही माहिती दिली.
‘लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये मी काही उमेदवारांचा प्रचार करायला गेले होते. मात्र त्याच दिवशी मला चार नामांकित ब्रॅण्ड गमवावे लागले. यामध्ये तीन इव्हेंटमधून मला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. यावरुन मला एक समजलं की सामाजिक आयुष्य जगत असताना अनेकदा आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागते’, असं स्वरा म्हणाली.
दरम्यान, स्वराने लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये कन्हैय्या कुमार,आतिशी मार्लेना, राघव चड्ढा आणि अमर राम यांचा प्रचार केला होता. सध्या स्वरा तिच्या आगामी ‘शीर कोरमा’ या चित्रपटामध्ये व्यस्त असून चित्रपटाची कथा एका लेस्बियन कपलभोवती फिरताना दाखविण्यात आली आहे.