या व्यक्तीमुळे साकारला कबीर सिंग- शाहिद कपूर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/kabir-singh-1.jpg)
शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर २३५. ७२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तेलुगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा रिमेक असलेला हा चित्रपट देशासह विदेशातही गाजत आहे. या चित्रपटात शाहिद कपूरसह कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहे. एकीकडे काहींनी शाहिदच्या दमदार अभिनयाची स्तुती केली तर दुसरीकडे शाहिदच्या आक्रमक भूमिकेवर काहींनी आक्षेप घेतला आहे. दरम्यान एका मुलाखतीमध्ये शाहिदने कबीर सिंगची भूमिका कोणामुळे साकारली याचा खुलासा केला आहे.
पिंकविलासह झालेल्या एका मुलाखतमीमध्ये शाहिदने कबीर सिंग या भूमिकेसाठी पत्नी मीरा राजपूतने मनधरणी केल्याचे सांगितले आहे. मीराने कबीर सिंगसाठी प्रोत्साहन देखील दिले असल्याचे त्याने सांगितले. ‘मीरा प्रचंड आशावादी आहे. त्यामुळेच मी केलेल्या चित्रपटांच्या यादीमध्ये अशा धाटणीचा एक तरी चित्रपट असावा अशी तिची इच्छा होती. आम्ही अर्जुन रेड्डी हा चित्रपट एकत्र पाहिला आणि तिला चित्रपटातील दिग्दर्शकांचे काम आवडले. दरम्यान तिला ही भूमिका दमदार असल्याचेदेखील जाणवले’ असे शाहिद कपूर म्हणाला.
‘कबीर सिंग’ या चित्रपटामध्ये शाहिदने एका तापट स्वभावाच्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची भूमिका साकारली आहे. ‘अर्जुन रेड्डी’चे दिग्दर्शक संदीप वांगा यांनीच कबीर सिंगचे दिग्दर्शन केले आहे.
‘कबीर सिंग’ हा चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे. ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट दक्षिणीकडे तुफान गाजला होता.