‘मोल’ चित्रपटाचे संगीत अनावरण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/mol-marathi-film-6-1.jpg)
‘मोल’ या मराठी चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नुकताच पार पडला. या सोहळ्याप्रसंगी चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते पारस बाविस्कर आणि समाजसेविका अंजलीताई बाविस्कर यांच्यासह अभिनेते मिलिंद शिंदे, गायक नंदेश उमप आणि संगीतकार श्याम क्षीरसागर हे मान्यवर उपस्थित होते. निर्माते – दिग्दर्शक योगेश कुलकर्णी आणि प्रस्तुतकर्ते पारस बाविस्कर यांनी मराठी आणि अहिराणी अशा दोन भाषांमध्ये ‘मोल’ संगीतमय चित्रपटाची निर्मिती केली आहे. अहिराणी ही खान्देशची बोली भाषा. खान्देशात अहिराणीला आईचा दर्जा आहे. खान्देशी भाषा आणि संस्कृतीचे दर्शन संपूर्ण महाराष्ट्राला घडावे या ध्यासातून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. असे जाधव यांनी या प्रसंगी सांगितले. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे खानदेशातील धुळे, जळगाव, नाशिक ,नंदुरबार या चारही जिल्ह्यातल्या ५० हून अधिक कलाकारांना संधी देण्यात आली आहे.
चित्रपटात योगेश कुलकर्णी, शीतल अहिरराव, किशोर कदम, नीला पाटील – गोखले, मिलिंद शिंदे, नलिनी कुलकर्णी, रमाकांत देसले, संजय भदाणे, अनिल मोरे आणि राजन पवार यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळतील. या चित्रपटाला संगीत अविनाश-विश्वजीत यांचे असून श्याम क्षीरसागर, बहिणाबाई चौधरी, विठ्ठल वाघ, अनिल अवचट, कमलाकर देसले, अश्विनी शेंडे, योगेश कुलकर्णी आणि राजन पवार यांनी लिहिलेल्या गाण्यांचा समावेश या चित्रपटात आहे. या चित्रपटातील गीतांना सुरेल सूर हरिहरन ,सुरेश वाडकर ,रवींद्र साठ्ये, साधना सरगम, वैशाली सामंत या दिग्गज गायकांसोबतच सुवर्णा माटेगावकर, मंदार आपटे, नंदेश उमप, ऋषीकेश रानडे, मैथिली पानसे, जयदीप बगवाडकर आणि श्याम क्षीरसागर या दमदार यांचे लाभला आहे.