breaking-newsमनोरंजन

‘बाप, सिनेमा आणि सिनेमातला बाप…'(फादर्स डे स्पेशल)

सिनेमा अाणि आई हे नातं तसं फार जुनं आणि तितकच घट्ट. फार वर्षांपूर्वीच्या श्यामची आई, मदर इंडिया यांच्यापासून ते आताच्या MOM पर्यंत कितीतरी आयांनी ही इंडस्ट्री गाजवली आहे. हे शिवधनुष्य उचलण्याची मुख्य जबाबदारी निरुपा राय, सुलोचनाबाई, रिमाजी यांनी लीलया पार पाडली. त्या मानाने ‘बाप’ आणि फिल्म इंडस्ट्री हे नातं तितकसं जुनं किंवा आई इतकं गाजलेलं नाही. ‘मेरे पास मा है’ म्हणणारा हिंदी सिनेमा सुरूवातीला ‘मेरा बाप चोर है’ असंच म्हणत असे. गमतीचा भाग सोडा पण मराठी आणि हिंदी दोन्हीकडे सुरूवातीला बऱ्याच सिनेमांमध्ये बाप हा दारूडा, दरिद्री, आईला मारहाण करणारा किंवा मग मुलांसाठी सावत्र आई अाणणारा असा रंगवला जायचा. ‘रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप लगते है…’ असं म्हणणारे काही अपवाद होते. पण ८० च्या दशकापर्यंत इंडस्ट्रीतल्या सगळ्या आयांचा आणि बापांचा average काढला तर गरिब आई आणि दारूडा बाप असाच येईल.

१९८३ चा शेखर कपुर यांचा ‘मासूम’ हा सिनेमा आणि त्यामध्ये नसिरुद्दीन शाह यांनी साकारलेला बाप मला अजूनही आठवतो. ‘तुझ से नाराज नही जिंदगी…’ म्हणत आपल्या जबाबदारीचं पालन कारणारा बाप अजूनही कधी पाहिला की डोळ्यांत पाणी आणतो.  ‘अकेले हम अकेले तुम’ या सिनेमातलं ‘तू मेरा दिल तू मेरी जान….’ हे गाणं मला खुप आवडायचं आणि अजूनही आवडतं. गंमत म्हणजे यात वडिलांना उदित नारायण यांनी तर मुलाला त्यांच्याच मुलाने म्हणजे आदित्य नारायणने आवाज दिल्यामुळे मला या गाण्याचं जास्तच कौतुक वाटायचं.

जसं आईच्या टीममध्ये निरूपा राय, रिमा तर इकडे बापाच्या टीममध्येही तितकाच तगडा आणि consistent performance असणारे अलोक नाथ आहेत. एकेकाळी फक्त ‘रिश्ते मे’ बाप लागणारे अमिताभ बच्चनसुद्धा आता या टीमचा भाग झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही. अलोक नाथ तर इतके वडील माणूस आहेत की Wikipedia वर त्यांची Filmography बघितली तर त्यांचे रोल ‘अमुक्स फादर’ आणि ‘तमुक्स dad’ असेच जास्त आहेत.

अमिताभ आणि त्यांनी साकारलेले बाप या विषयावर तर एक चांगलं पुस्तक निघू शकेल. Set Max वरच राहणारा सूर्यवंशम मधला ठाकूर, मोहोब्बते मधला ऐश्वर्याचा बाप हे त्यांनी केलेले काही सुरुवातीचे बाप. बागवान, कभी खुशी कभी गम, सरकार, विरूद्ध, पिकू या सगळ्यामधून भिन्न छटा असणारा बाप आपल्याला पहायला मिळतो. ‘पा’ सिनेमात तर अभिषेक ने आपल्या बापाच्याच बापाची भुमिका केली होती.

दंगल मधला बापू तर आतापर्यंतच्या सिनेमातल्या बाप या विषयीची सगळी उणीदुणी भरून काढतो. तसेच उडान मधला रोनित रॉय यांनी साकारलेल्या बापाचा उल्लेख केल्याशिवाय हा विषय पूर्णच होऊ शकत नाही. हा बाप negative आहे तरीही तो आठवत राहतो. मराठीतही अलिकडे आलेला व्हेन्टिलेटर हा सिनेमा या विषयाला खुपच छान हाताळतो आणि पाहणाऱ्याच्या डोळ्यांतून नकळत पाणी काढतो.

लिस्ट करायचीच म्हटलं तर बरीच लांब होईल. काही सिनेमे इथे राहून गेले असतील. पुष्कळ सिनेमे  झाले, पुढेही होतील. ‘बाप’ विषयावर आणखी चांगले सिनेमे येतील. ते येतील तेव्हा येतील. पण विषय कोणताही असो, एखाद्याला त्याच्या आवडीच्या पिक्चर बद्दल विचारून बघा “कसा होता रे सिनेमा? ” लगेच उत्तर येईल, “अरे, खुपच ‘बाप’ होता !”

Happy father’s day!

– अक्षय बाळासाहेब मलिकपेठकर

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button