प्रियांका चोप्रा बनली लेखिका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/priyanka-chopra-1-1.jpg)
ट्विंकल खन्ना, ऋषी कपूर, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आयुष्मान खुराना यांनी आपापल्या अनुभवांच्या आधारे पुस्तक लिहून प्रकाशित केले आहे. आता त्यांच्या पावलावर पाऊल टाकून प्रियांका चोप्रानेही हातात लेखणी घेतली आहे. तिने एक पुस्तक लिहायला घेतले आहे. त्याचे नाव आहे “अनफिनिश्ड’. त्यामध्ये प्रियांकाशी संबंधित काही जुन्या आठवणी, सिनेतील काही मान्यवरांबरोबरचे किस्से आणि काही कडू गोड अनुभवांचा समावेश असेल. आता प्रियांकाने हे पुस्तक लिहायला सुरुवात केली आहे. पुढील वर्षी तिचे हे पुस्तक प्रकाशित होण्याची शक्यता आहे.
ज्या विषयांबाबत प्रियांकाने काहीही मत व्यक्त केलेले नाही, किंवा ज्या गोष्टींबाबत ती अद्याप बोललेलीच नाही असे सर्वकाही या पुस्तकामध्ये मांडण्यचा तिचा प्रयत्न असेल. आपल्या अगदी वैयक्तिक, खासगी आयुष्यातील घटनाही ती यामध्ये मांडणार आहे, असे या पुस्तकाचे प्रकाश करणाऱ्या पेंग्विन रॅडम हाऊसने म्हटले आहे.
प्रियांका बॉलिवूडमध्ये कोणत्याही गॉडफादरशिवाय यशस्वी झाली आहे. एवढेच नव्हे तर तिने हॉलिवूडही गाजवले आहे. तिने अभिनयाच्या बरोबर चित्रपट निर्मितीही केली आहे. तिच्या या यशामुळे ती युवा वर्गासाठी एक रोलमॉडेल बनली आहे. तिच्या अनुभवांमधून युवकांना विशेषतः मुलींना नक्कीच प्रेरणा मिळेल, असा विश्वासही पेंग्विनने व्यक्त केला आहे. मोठी स्वप्ने बघावीत आणि ती स्वप्ने पूर्ण कशी करावीत, यासाठी प्रियांकाचे हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे.
प्रियांकाची ख्याती भारताबाहेर अमेरिका आणि ब्रिटनमध्ये अधिक आहे. त्यामुळे हे पुस्तकही अमेरिका आणि ब्रिटनमध्येही प्रकाशित केले जाणार आहे.
हे पुस्तक माझ्यासारखेच प्रामाणिक, खुसखुशीत, जोरदार, किंचीत राग व्यक्त करणारे आणि बरेचसे बोल्ड आणि विद्रोही असणार आहे, असे प्रियांकाने सांगितले. स्वतःच्या खासगी आयुष्याला कधीच लोकांच्या समोर येऊ न देणाऱ्या प्रियांकाचा एक बॉयफ्रेंड मात्र नुकताच लोकांना समजला आहे. निक जोनास या युवा गायकाबद्दलच्या तिच्या अफेअरला आता अधिक परिपक्व समजले जायला लागले आहे. प्रियांकाचा यापूर्वी एक ब्रेकअप होऊन गेला आहे. त्याबद्दलही ती या पुस्तकात खुलेपणाने लिहीणार आहे, अशी अपेक्षा आहे.