ते माझे ठुमकेच पाहत असतील; सपना चौधरीचे भाजप खासदाराला प्रत्युत्तर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/bjp-mp-ashwini-kumar-sapna-choudhary-.jpg)
चंडीगढ: बिग बॉसची माजी स्पर्धक आणि हरयाणा येथील प्रसिद्ध गायिका आणि डान्सर सपना चौधरी हिचा ‘ठुमकेवाली’ असा उल्लेख करणारे भाजपचे खासदार अश्विनी कुमार चौप्रा यांना तिने चोख प्रत्युत्तर दिले आहे. ‘त्यांनी माझे ठुमकेच पाहिले असतील, म्हणून त्यांनी असे वक्तव्य केले’ असे सपना चौधरी हिने पलटवार करताना म्हटले आहे.
‘तुम्ही जे बोलता त्यातून तुमची मानसिकता दिसून येते. मी एक कलाकार असून माझ्या कामावर जास्त लक्ष देते. अश्विनी कुमार चोप्रा हे वरिष्ठ असल्यानं त्यांनी माझी माफी मागावी असं मला वाटत नाही, असेही सपनाने स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी सपना चौधरीने काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यामुळे सपना चौधरी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली. सपनाच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल बोलताना अश्विनी कुमार चोप्रा यांनी तिचा ‘ठुमकेवाली’ असा उल्लेख केला होता.
सपना चौधरी हिने अनेकदा काँग्रेसचा प्रचार करण्याची इच्छा व्यक्त केली होती. याबद्दल अश्विनी कुमार चोप्रा यांना विचारले असता त्यांनी ‘काँग्रेसला निवडणूक लढवायची आहे की ठुमके लावणाऱ्यांना नाचवायचे आहे? काँग्रेसला ठुमक्यांमध्येच जास्त रस आहे’, असे वादग्रस्त विधान केले होते.