इतिहासावर आधारित चित्रपटांच्या वादाचा अध्याय सुरूच
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/mv-3-5.jpg)
- मराठय़ांच्या इतिहासावर आधारित चित्रपटांना वादाचे गालबोट
सध्या मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून मनोरंजनाचा मोठा पडदा व्यापणारे ऐतिहासिकपट विविध कारणांमुळे वादविवाद आणि चर्चेला कारणीभूत ठरत आहेत. यात सध्या सर्वाधिक आघाडीवर हिंदीत प्रदर्शित होणारे आणि मराठय़ांच्या इतिहासाशी संबंधित असलेले ‘पानिपत’ आणि ‘तान्हाजी’ असे दोन मोठे ऐतिहासिक चित्रपट आहेत. हे चित्रपट अगदी ‘प्रोमो’पासून ऐतिहासिक तपशील, संदर्भ, संवाद, वेशभूषा आदी कारणांमुळे वाद ओढवून घेत आहेत.
ऐतिहासिक चित्रपटाच्या प्रदर्शनावेळीस उद्भवणारे वाद नवीन नाहीत. याआधी ‘पद्मावत’ करणी सेनेचा विरोध, अचानक नाकारलेले सेन्सॉरचे प्रमाणपत्र, गुजरात सरकारने घातलेली बंदी यामुळे वादात सापडला होता. तर ‘बाजीराव मस्तानी’ आणि त्याहीआधी गोवारीकर यांच्या ‘जोधा अकबर’ या चित्रपटांनाही अशा प्रकारच्या वादाला तोंड द्यावे लागले होते. पुढील महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या ‘तान्हाजी’ आणि ‘पानिपत’ या दोन्ही चित्रपटांना समाजमाध्यमांवरील वादविवाद आणि चेष्टेला सामोरे जावे लागते आहे. ‘पानिपत’ या आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित चित्रपटात अर्जुन कपूर, क्रिती सनन आणि संजय दत्त प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. अफगाणिस्तानमध्ये अहमदशाह अब्दाली याच्याविषयी जनमानसांत प्रचंड आदर आहे. त्यामुळे या चित्रपटातून अब्दालीचे पात्र नकारात्मक पद्धतीने रंगवू नये, अशी इच्छा व्यक्त करत आहेत. अफगाणिस्तानचे राजदूत नसीम शरीफी आणि माजी अधिकारी शईदा अब्दाली यांनी अशा आशयाचे ट्वीट केले आहे. दुसरीकडे या चित्रपटावर भन्साळींच्या ‘पद्मावत’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटांचा प्रभाव असल्याची चर्चाही समाजमाध्यमांवर वेगवेगळ्या मीम्समधून रंगली आहे. ‘गरिबांचे पद्मावत’ आणि ‘पानिपत- अग्निपथ’ अशा आशयांचे मीम्स समाजमाध्यमांवर फिरत आहेत.