इंडियन आयडल रेणूच्या प्रियकराची आत्महत्या, धक्क्यामुळे रेणूही अत्यावस्थ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/IMG-20-WA0034.jpg)
जयपूर – ‘सा रे गा मा पा’ आणि ‘इंडियन आयडल’ या रिअॅलिटी शोमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली राजस्थानची गायिका रेणू नागर हिचा प्रियकर रवी नट याने विष पिऊन आत्महत्या केली. त्याच्या मृत्युची बातमी ऐकून रेणूही जागीच कोसळली. त्यामुळे तिची प्रकृतीही चिंताजनक असून अतिदक्षता कक्षात तिच्यावर उपचार सुरू आहेत.
राजस्थानच्या अल्वर जिल्ह्यातील गायिका रेणू नागर रिअॅलिटी शोमुळे घराघरात पोहोचली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती वैयक्तिक आयुष्यातील निर्णयांमुळे चर्चेत आली होती. महिनाभरापूर्वी ती आपल्या विवाहित प्रियकर रवीसोबत घरातून पळून गेली होती. त्यानंतर गेल्या ५ दिवसांनी ती अल्वरला परत आली होती. दरम्यान, तिच्या वडिलांनी रवीने तिला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्यामुळे पोलीसांनी रवीला ताब्यात घेतले होते.
परंतु रेणूच्या जबानीनंतर त्यांनी त्याला सोडून दिले होते. परंतु काल सायंकाळी ७ च्या सुमारास रवीने विष प्राशन केले. त्यामुळे त्याला रेणूने रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ही बातमी कळताच रेणू जमीनीवर कोसळली. त्यामुळे तिलाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेशुद्ध असलेल्या रेणूवर आयसीयूत उपचार सुरू आहेत.