TOP Newsताज्या घडामोडीपुणे

परतीचा पाऊस आणि मजूर टंचाईचा परिणाम

पुणे : उसाखालील वाढलेले क्षेत्र, उशिराने सुरू झालेला गाळप हंगाम, परतीच्या पावसामुळे निर्माण झालेला व्यत्यय आणि मोठी मजूर टंचाई आदींचा परिणाम म्हणून यंदाच्या गळीत हंगामात २८ ऑक्टोबपर्यंत फक्त ३२ कारखाने सुरू झाले आहेत. सुरुवात संथगतीने झाल्यामुळे हंगामाचे नियोजन कोलमडण्याची शक्यता वाढली आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ऊसतोडणीसाठी यंत्रांचा वापर वाढविण्याचे धोरण असले तरीही चिखलात यंत्रांद्वारे ऊसतोडणी होऊ शकत नाही. दिवाळीमुळे अद्याप पुरेशा प्रमाणावर मजूर कारखान्यांवर आलेले नाहीत. आता दिवाळीनंतर मजुरांचा ओघ सुरू झाला आहे. पण, शेतात चिखल असल्यामुळे मजुरांकडूनही तोडणी शक्य नाही. शिवाय शेत रस्त्यांवर, पाणंद रस्त्यांवर अद्याप चिखल असल्यामुळे तोडलेला ऊसही फडातून बाहेर काढता येत नाही. त्यामुळे तात्पुरता उपाय म्हणून माळरानावरील ऊस तोडण्याला प्राधान्य दिले जात आहे.’

पुरेशा प्रमाणात ऊसतोडणी होऊन कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी नोव्हेंबरचा पहिला आठवडा उजाडणार आहे. सुमारे वीस दिवस हंगाम उशिराने सुरू होणार आहे. प्रारंभाला झालेल्या या उशिरामुळे हंगामाचे नियोजन कोलमडून पडणार आहे. हंगाम शेवटच्या टप्प्यात रखडण्याचे चिन्हे आहेत. मागील वर्षी मराठवाडय़ातील ऊसतोडणीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागले होते. वाढलेल्या उन्हामुळे हंगामाच्या अखेरीस काम करण्यास मजूर तयार नव्हते. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील तोडणी यंत्रे मराठवाडय़ात पाठविण्यात आली होती. तशीच स्थिती यंदाही निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

गेल्या वर्षीचा हंगाम…

उसाचे एकूण क्षेत्र : १३.६७ लाख हेक्टर

गाळप सुरू केलेले कारखाने : २००

सरासरी गाळप दिवस : १७३

जास्तीत जास्त गाळप दिवस : २४० (मराठवाडा)

एकूण गाळप : १३२०.३१ लाख टन

एकूण साखर उत्पादन : १३७.२८ लाख टन

काय झाले?

राज्यात यंदा उसाखालील क्षेत्र सुमारे १४ लाख हेक्टरच्या घरात आहे. गेल्या वर्षी गळीत हंगाम रखडला होता. त्यामुळे यंदा साखर आयुक्तालयाने एक ऑक्टोबरला हंगाम सुरू करण्याचे नियोजन होते, प्रत्यक्षात तसे झाले नाही. राज्य सरकारने पंधरा ऑक्टोबरपासून अधिकृत हंगाम सुरू करण्याचे आदेश दिले होते. पण, परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे अजूनही उसाच्या शेतात चिखल आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button