ताज्या घडामोडीमुंबई

भिंतींमुळे पूरस्थिती नियंत्रणात येण्याची खात्री नाही ;जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंग यांची आरेमध्ये अधिकऱ्यांशी चर्चा

मुंबई|मरोळ येथील बामनदया पाडा येथून वाहणाऱ्या मिठी नदीचे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंग यांनी रविवारी निरीक्षण करून मिठीच्या समस्येबद्दल महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आरेमध्ये नदीच्या पात्रात घातला जाणारा भराव, मिठीमध्ये आरेमधील गोठ्यांमधून येणारे शेण, मिठीमुळे निर्माण होणारी पूरस्थिती, नदीची स्वच्छता अशा विषयांना स्पर्श करण्यात आला. यावेळी नदीभोवती उंच होणाऱ्या भिंतीमुळे पूरस्थिती नियंत्रणात येणार नसून त्यासाठी नदीचा पूर्णत्वाने विचार करण्याची गरज असल्याचे डॉ. सिंग यांनी स्पष्ट केले. तसेच मिठीचे खोलीकरण, तिच्यातील काँक्रिटीकरण न काढल्यास मोठ्या पावसामध्ये नदीतील पाणी पर्जन्यजल वाहिन्यांमधून बाहेर येऊन आजूबाजूच्या परिसरात अशीच पूरस्थिती निर्माण होईल, असे ते म्हणाले.

आरेमध्ये गेल्या वर्षी अभूतपूर्व पाणी साचले होते. बामनदया पाडा येथील संपर्कही काही काळ तुटला होता. बामनदया पाड्याजवळ मिठीच्या काठावर बांधण्यात आलेली भिंती चार वर्षांपूर्वीपेक्षा अधिक उंच झाली असून यामुळे नदीची पूरस्थिती नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे काँक्रिटीकरण वाढवणे हा पूरस्थितीवरील उपाय नाही हे सरकार आणि स्थानिक प्रशासनाने, संबंधित यंत्रणांनी लक्षात घेणे आवश्यक आहे, असे आरे वाचवा मोहिमेतील अमृता भट्टाचारजी यांनी सांगितले.

बामनदया पाडा येथे नदी स्वच्छतेसाठी एक रॅम्पही तयार केला जात आहे. बांधकामाचा राडारोडा आणून नदीत टाकण्यापेक्षा हा राडारोडा बांधकामांच्या ठिकाणीच वापरला जावा. नदीमध्ये रॅम्प तयार करण्यासाठी वापरलेल्या राड्यारोड्यामध्ये सीमेंट-काँक्रिटपासून अनेक गोष्टी आहेत. हा राडारोडा नदीतील गाळ काढल्यानंतर पुन्हा उपसला जाईल याची खात्री देता येत नसल्याने तसेच राडारोडा उचलल्यानंतर तो नदीच्या काठावरच फेकला जात असल्याने तो पावसाळ्यात पुन्हा नदीमध्ये जाण्याची शक्यता असते याकडे डॉ. सिंग यांनी लक्ष वेधले. याऐवजी जिथे नदीमध्ये माणसे उतरून गाळ स्वच्छ करू शकतील तिथे मानवी प्रयत्नांमधून गाळ स्वच्छ व्हावा. यामुळे अनेकांना रोजगारही मिळेल असा पर्याय त्यांनी सुचवला.

कचरा रोखण्याची गरज

मुंबई आणि ठाण्याच्या जलनायक डॉ. स्नेहल दोंदे यांनी आरेतील तपेश्वर मंदिराजवळ सुरू असलेल्या ड्रेनेज पाइपलाइनच्या कामाबद्दलही डॉ. सिंग यांना माहिती दिली. या संपूर्ण परिस्थितीची पाहणी केल्यावर नदीचे खोलीकरण गरजेचे असून जिथे शेणाचा मारा होत आहे तिथे जैव उपचारात्मक पद्धती वापरून नदीत किंवा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामध्ये (एसटीपी) येणारा कचरा थांबवावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button